विषारी दारू मृत्यूप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे १३ अधिकारी निलंबित,३ निरीक्षक, ६ उपनिरीक्षक आणि ४ कॉन्स्टेबलांवर कारवाई

विशेष प्रतिनिधी

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूंच्या गंभीर प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

संबंधित भागात अवैध दारू निर्मिती व विक्री रोखण्यात झालेल्या कथित हलगर्जीपणा आणि देखरेखीतील त्रुटींसाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक अतुल कानडे यांनी या कारवाईला दुजोरा दिला. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये ३ निरीक्षक, ६ उपनिरीक्षक आणि ४ कॉन्स्टेबलांचा समावेश आहे.



विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध यंत्रणांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीचे जाळे नेमके कसे कार्यरत होते, तसेच संबंधित यंत्रणांकडून कोणत्या पातळीवर दुर्लक्ष झाले, याची चौकशी सुरू आहे.

ज्या भागांमध्ये अवैध दारूचा व्यवसाय सुरू होता त्या परिसरांवर प्रभावी कारवाई करण्यात संबंधित अधिकाऱ्यांना अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या निष्कर्षांच्या आधारे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, विषारी दारू प्रकरणाचा तपास पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि अन्य तपास यंत्रणांकडून सुरू असून दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर अवैध दारूविरोधातील राज्यव्यापी मोहिमेला आणखी वेग देण्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे अवैध दारू प्रकरणात केवळ दारूमाफियांवरच नव्हे तर कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे.

13 State Excise officials suspended in toxic liquor deaths case; action against 3 inspectors, 6 sub-inspectors and 4 constables

महत्वाच्या बातम्या