विशेष प्रतिनिधी
सोलापूर: राज्यभरात सध्या विधानपरिषदेच्या १७ जागांची धुमाळी सुरू आहे.महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील उमेदवारीबाबत अजूनही तिढा कायम आहे.विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील भाजपाच्या संख्याबळाचा विचार करून, भाजपा विधानपरिषद निवडणुकीत मोठा विजय संपादन करेल, असा विश्वास व्यक्त केला होता.तसेच सोलापूर निवडणुक भाजपासाठी एकतर्फी एकतर्फी समजली जात असेल तर, ती पूर्णपणे बिनविरोध करत इतिहास घडवण्यासाठी भाजपा भूमिकेत आहे,असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले होते.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीत मोठा टर्न आला आहे.भाजपाकडून सोलापूर विधानपरिषदेसाठी महिला नेत्याचा विचार सुरू आहे.
भाजपा कडून सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत, रणजीसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, विक्रम देशमुख, शिवाजीराव सावंत हे नेते उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणत्या महिला नेत्यांची चर्चा?
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातून महिला नेत्याला उमेदवारी देण्याबाबत भाजपात जोरदार हालचाली सुरू आहेत.त्यात रश्मी बागल, ॲड.श्रद्धा जवंजाळ आणि राजश्री नागणे या तीन महिला नेत्यांचा नावाची चर्चा आहे.मात्र, या चर्चेत असलेल्या तीन महिलांपैकी कुणाच्या नावाला पसंती द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे घेणार असल्याची चर्चा आहे.
भाजपा संख्याबळ किती?
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेत एकूण ६१६ मत आहेत.त्यापैकी ४५० पेक्षा जास्त मते ही भाजपा आणि महायुती कडे आहेत.त्यामुळे आता सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी कोणत्या महिला नेत्याचा नावावर शिक्कामोर्तब केला जातो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.