Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या दाव्यामुळे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर वादात नवा ट्विस्ट ?

विशेष प्रतिनिधी

सांगली : Chandrakant Patil : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील शाब्दिक वाद आता सर्वपरिचित झाला आहे. सांगलीत झालेल्या इशारा सभेनंतर आता उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांनी आपल्याला फोन केल्याचा दावा केला आहे.



भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आपल्या आक्रमक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. जत विधानसभेतून आमदार झाल्यापासून ते सांगलीच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. सांगलीच्या राजकारणात त्यांचा वावर वाढल्याने जयंत पाटील यांच्याशी त्यांचा संघर्ष अटळ ठरला आहे. काही दिवसांपूर्वी एका सभेत बोलताना पडळकर यांनी जयंत पाटील आणि राजारामबापू यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर भाजपकडून पडळकर यांना समज देण्यात आली होती. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी राजारामबापूंना अभिवादन करून जयंत पाटलांचे कथित घोटाळे उघड करण्याचा सल्ला पडळकर यांना दिला होता.

पडळकर यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थनात आणि विरोधात सांगलीत अनेक ठिकाणी सभा आणि आंदोलने झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगलीत संस्कृती बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने इशारा सभा घेतली. या सभेत पडळकर आणि चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप केले. “जयंत पाटलांचे घोटाळे उघड करण्याची तयारी भाजपने केली आहे. महाराष्ट्र उत्सव कोणी वाटोळे केला, हे तुम्हाला पुस्तक वाचल्यावर कळेल. महाराष्ट्राच्या दगाबाजाने किती साखर कारखाने घेतले, कुठे मालमत्ता ठेवली, हे सारे गुपित आहे. निवडणूक आयोगाच्या शपथपत्रात त्यांच्या नावावर एकही गाडी नाही, पण त्यांच्याकडे किती विमाने आहेत आणि कोणत्या विमान कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे, हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. त्यामुळे त्यांनी वेळीच शहाणे व्हावे,” असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी इशारा सभेत दिला होता.

सांगलीत इशारा सभा होऊ नये, अशी जयंत पाटलांची इच्छा होती, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. इशारा सभेनंतर जयंत पाटलांची अवस्था बिकट झाली आहे. “झाले गेले विसरून हा विषय संपवण्यासाठी स्वतः जयंत पाटील यांनी मला फोन केला,” असा दावा चंद्रकांत पाटील यांनी आता केला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंत पाटील यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल.

Chandrakant Patil’s claim brings a new twist to the Jayant Patil and Gopichand Padalkar controversy?

महत्वाच्या बातम्या