विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याची चर्चा रंगत असताना खासदारांच्या हालचालींवरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राऊत यांनी दावा केला की, नांदेड विमानतळावर एक चार्टर्ड विमान उतरले आणि “ऑपरेशन”च्या नावाखाली दोन खासदारांना घेऊन गेले. “ज्यांच्याकडे कधीकाळी रिक्षाने प्रवास करण्याचीही सोय नव्हती, त्यांची किंमत आज ठाकरे नावामुळे खासगी विमानातून प्रवास करण्याइतकी वाढली आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेतला जाईल,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“भेकड कोल्ह्यांची पळापळ रोखण्यात आली आहे,” असेही म्हणत त्यांनी पक्षांतराच्या चर्चांवर अप्रत्यक्ष टीका केली. राऊत यांच्या या वक्तव्याकडे शिंदे गटात जाण्याची चर्चा असलेल्या खासदारांवर निशाणा म्हणून पाहिले जात आहे.
राऊत यांनी केलेल्या पोस्टमध्ये नांदेड विमानतळावर व्ही टी – एनएसजी या कंपनीचे विमान दिसत आहे.
दरम्यान, ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, संजय राऊत यांच्या पोस्टमुळे शिवसेनेतील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून आगामी काळात या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sanjay Raut Alleges Chartered Plane Used to Ferry MPs Amid Defection Buzz
महत्वाच्या बातम्या
- Nagpur : कर्करोगावरील उपचार, संशोधनासाठी नागपूरला हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्प
- महाराष्ट्र पोलिसांना मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, केंद्र सरकारकडून योजना मंजूर
- मुठा नदीपात्र स्वच्छता अभियानात पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
- शपथा आणि शिवबंधन नव्हे, माणुसकीच्या बंधनाने खासदार टिकतात, नवनाथ बन यांचा टोला