Pawanraje : पवनराजे दुहेरी हत्याकांड प्रकरणात आज सत्र न्यायालय देणार निकाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Pawanraje  2006 साली राज्यभर गाजलेल्या कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 16 जुनला लागणार आहे. 14 मे रोजीच्या सुनावणी वेळी मुख्य संशयित आरोपी माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील व मोहन शुक्ला हे 2 जण वैद्यकीय कारण सांगत गैरहजर होते त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कोर्टाने त्यांचा हजेरी माफीचा अर्ज मंजुर करताना यापुढे संधी मिळणार नाही असे सांगितल्याने तारीख पे तारीखचा सिलसिला संपण्याची शक्यता आहे. रक्तरंजित हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षानंतर फैसला होणार आहे.Pawanraje

मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असुन त्याच्या कबुली जबाब भोवती हे संपुर्ण प्रकरण आहे. राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे.Pawanraje



पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी 2005 मध्ये लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली त्यानंतर तो धाराशिवला आला मात्र डाव फसल्याने तब्बल 16 महिने कट रचून, पाळत ठेवून 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे भरदिवसा गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली, त्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीतुन निलंबन झाले. महाराष्ट्र पोलिस, सीआयडी व त्यानंतर सीबीआय अश्या 3 तपास यंत्रणानी याचा तपास केला असुन सुनावणी दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार तपासण्यात आले.

माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे 9 जण दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत. सीबीआयचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक अमिताभ ठाकुर व त्यांच्या टीमची भुमिका महत्वाची राहिली. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या याचिकेनंतर हे प्रकरण अंतीम टप्प्यात आले, डॉ जय राजे निंबाळकर हे यांनी याचा पाठपुरावा केला.

हत्याकांडातील माफीचा साक्षीदार पारसमल जैनला 14 वर्षांनी व शुटर दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर तर डॉ पाटील यांना साडे 3 महिन्यात जामीन मिळाला होता. सर्व आरोपी जामिनावर बाहेर असुन 16 जुन रोजी त्यांना कोर्टात निकालासाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत, सर्व आरोपी हजर राहिल्यास त्या दिवशी कोर्ट आपला निर्णय जाहीर करू शकते. तेरणा ट्रस्ट, तेरणा कारखाना, 2004 ची विधानसभा निवडणुकीसह अन्य मुद्दे सुनावणी दरम्यान मांडण्यात आले.

दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी व कट रचल्याच्या प्रकरणात लातुर कोर्टात 29 जुन रोजी सुनावणी होणार असुन मंदाडे याच्या विरोधात वॉरंट काढले आहे. गेली 17 वर्षांपासून या प्रकरणात काहीही झालेले नाही. 29 सप्टेंबर 2009 रोजी हत्येची सुपारी व कट रचल्याचा गुन्हा अण्णा हजारे यांनी लातुर एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केला त्यानंतर डॉ जय राजे यांनी माहितीच्या अधिकारात तपासाची माहिती मागितली. तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला ( साक्षी व पुरावे प्रक्रिया) सुरुवात झालेली नाही. 4 वर्षापासुन चार्ज फ्रेम झाला नसुन तारीख पे तारीखचा सिलसिला सुरु आहे.

Sessions Court to Deliver Verdict Today in Pawanraje Double Murder Case

महत्वाच्या बातम्या