जमिनीच्या व्यवहारातून अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि पती गोल्डी बेहल यांच्यावर शेतकऱ्याचा दावा

विशेष प्रतिनिधी

पुणे : प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारावरून कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. उकसान गावातील सुमारे 30 गुंठे जमिनीच्या खरेदीत नियमभंग आणि फसवणूक केल्याचा आरोप करत स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. Sonali Bendre

वडगाव मावळ न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात मौजे उकसान येथील सर्व्हे क्रमांक 121/1 मधील जमीन परस्पर खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदार चंद्रकांत शिंदे यांच्या वतीने वकील वनराज शिंदे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन ही त्यांच्या कुटुंबाच्या वहिवाटीत असून 1957 पासून त्यांच्या आजोबा केसू बाबाजी शिंदे यांच्या नावावर आहे. त्यामुळे या जमिनीवर कुळ हक्क असल्याचा दावा करण्यात आला आहे.



मूळ मालकाने ही जमीन बेकायदेशीरपणे दुसऱ्या व्यक्तीला विकली आणि त्यानंतर कुळ हक्काची माहिती लपवून ती पुढे सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांना विकण्यात आली. याशिवाय, डिसेंबर 2025 मध्ये या जागेवर भेट दिली असता सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांनी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांशी वाद घातल्याचाही आरोप करण्यात आला आहे. फक्त सातबारा आणि खरेदीखतावर नाव असणे म्हणजे मालकी सिद्ध होत नाही. कुळ हक्क लपवून व्यवहार करण्यात आला आहे, असा दावा तक्रारदारांच्या वकिलांनी केला आहे.

दरम्यान, या सर्व आरोपांना बचाव पक्षाने ठामपणे फेटाळले आहे. सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या वतीने वकील राजू शिंदे यांनी सांगितले की, संबंधित जमीन प्रत्यक्षात सोनाली बेंद्रे यांच्या नावावर नाही, त्यामुळे त्यांचा या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 8 जून 1965 रोजी तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार केसू शिंदे हे त्या जमिनीचे मालक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

Farmer Files Land Dispute Claim Against Sonali Bendre and Goldie Behl

महत्वाच्या बातम्या