राज्यात तीन दिवसीय वारकरी साहित्य संमेलन होणार!मंत्री उदय सामंतांची घोषणा…

विशेष प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा आणि वारकरी संस्कृतीचा जागर करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने लवकरच स्वतंत्र तीन दिवसीय वारकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. पुण्यात रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यात संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख डॉ. राजेंद्र उमाप, तसेच हभप पुरुषोत्तम पाटील, हभप उमेश महाराज मोरे, सचिन ईटकर यांची उपस्थिती होती.



यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे मोठे कार्य केले असून सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याची ताकद या परंपरेत आहे. त्यामुळे या परंपरेचा गौरव करण्यासाठी राज्य शासन तीन दिवसीय वारकरी साहित्य संमेलन आयोजित करणार असून, यामध्ये राज्यभरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा प्रयत्न केला जाणार आहे.

उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,कीर्तनकार आणि भारुडकरांनी अवघड तत्त्वज्ञान सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आणि जनजागृतीसाठी संतविचार आजही तितकेच उपयुक्त असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

या सोहळ्यामुळे वारकरी परंपरेचा गौरव होत असून, आगामी वारकरी साहित्य संमेलनाबाबतही राज्यभरात वारकरी संप्रदायात उत्सुकता निर्माण झाली आहे.

There will be a three-day Warkari literature festival in the state! Minister Uday Samanta’s announcement…

 

महत्वाच्या बातम्या