पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष, पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

विशेष प्रतिनिधी

मुंबई: राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यामध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदार आणि पुरावे यांचा सखोल अभ्यास केला. सीबीआयने पद्मसिंह पाटील यांच्यावर हत्येची मुख्य सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र, सादर केलेले पुरावे आणि साक्षीदार आरोपींना दोषी ठरवण्यासाठी पुरेसे ठरले नाहीत.



३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या राजकीय हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. या प्रकरणात सुरुवातीला स्थानिक पोलिस आणि नंतर सीबीआयने तपास केला होता. खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाने आपल्या वडिलांच्या न्यायासाठी गेली २० वर्षे कायदेशीर लढा दिला. मात्र, आज न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष सोडल्यामुळे आता निंबाळकर कुटुंब या निकालावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण लक्ष लागले आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, पवनराजे निंबाळकर यांच्यासह एकाची राजकीय वैमनस्यातून निर्घृण हत्या होते आणि प्रकरणात ढीगभर पुरावे असतानाही आरोपी निर्दोष सुटतात. हा निकाल पाहून मनात संताप, चीड आणि अस्वस्थता याशिवाय काहीच उरत नाही. धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणातील आरोपी कोण आहेत हे माहीत आहे. तरीही न्याय मिळत नाही, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. अशा निकालांमुळे सामान्य नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होतो. आज प्रश्न फक्त एका खटल्याचा नाही, तर न्यायाच्या आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दानवे यांनी म्हटले आहे.

Pawanraje Nimbalkar murder case

महत्वाच्या बातम्या