BEST workers : बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप कायम; मुंबईत 2,766 पैकी फक्त 48 बस रस्त्यावर

विशेष प्रतिनिधी

मुंबई : BEST workers बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे शुक्रवारी मुंबईतील बससेवा जवळपास पूर्णपणे ठप्प झाली. नियोजित 2,766 बसांपैकी अवघ्या 48 बस रस्त्यावर धावल्याने लाखो प्रवाशांचे मोठे हाल झाले.BEST workers

बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात केवळ 9 बेस्टच्या मालकीच्या आणि 39 वेट-लीज बस प्रवाशांच्या सेवेत होत्या. म्हणजेच नियोजित बसपैकी दोन टक्क्यांपेक्षाही कमी बससेवा सुरू होती.BEST workers



बेस्ट प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संयुक्त कामगार कृती समितीशी संलग्न संघटनांनी संप पुकारला आहे. मात्र, सुमारे 46 टक्के कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेस्ट वर्कर्स युनियनने या संपात सहभाग घेतलेला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपाबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला कामगार संघटनांचे प्रतिनिधी, बेस्ट अधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता तसेच आमदार सचिन अहिर उपस्थित होते. बैठकीत हा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संप मागे घेण्याचे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी कामगार संघटनांना केले.

तथापि, BEST कृती समितीचे संयोजक उदय आंबोणकर यांनी बैठकीनंतर सांगितले की, चर्चा सकारात्मक झाली असली तरी कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपादरम्यान शहरात 26 अनुचित घटना घडल्याची माहिती BEST प्रशासनाने दिली आहे. यामध्ये 10 दगडफेकीच्या, 10 धमकीच्या, 3 बसच्या टायरमधील हवा सोडण्याच्या आणि 3 बसचे आरसे फोडण्याच्या घटनांचा समावेश आहे.

दरम्यान, बससेवा ठप्प असली तरी मुंबईतील वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम झालेला नसल्याचे BEST प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संयुक्त कामगार कृती समितीच्या नेत्यांची उशिरापर्यंत बैठक सुरू असून, पुढील आंदोलनाची दिशा लवकरच जाहीर केली जाणार आहे.

BEST workers’ indefinite strike continues; only 48 of 2,766 buses on Mumbai roads

महत्वाच्या बातम्या