विशेष प्रतिनिधी
पुणे: महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील मिळकतकर वसुलीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.बनावट नोंदणीच्या माध्यमातून कर चुकवणाऱ्या नागरिकांवरोधात पालिकेने कठोर भूमिका घेतली आहे.संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.महापालिकेत गावांचा समावेश होण्यापूर्वीच काही ठिकाणी बांधकामे दाखवून, नोंदींमध्ये गफलत करून किव्वा खोटी कागदपत्रे सादर करून मिळकतकर चुकवल्याची बाब समोर आली आहे.अनेक गावांमध्ये असा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
दरम्यान, महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमधील तब्बल 34 हजार मिळकतींची तपासणी केली जाणार आहे. सदरील तपासणीत झालेल्या बांधकामाचा कालावधी, नोंदणीची तारीख, सध्याची स्थिती, मालकी हक्काची कागदपत्रे हे सर्व गोष्टींचे पडताळणी केली जाणार आहे.ज्या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे उघड होईल,त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
अधिक माहिती नुसार, काही भागात मालमत्तेच्या नोंदी संशयास्पद पद्धतीने करण्यात आल्याचे समोर आले आहे.सदरील प्रकरणात चुकीचे क्षेत्रफळ दाखवणे, मालकी हक्काची दिशाभूल करणारी माहिती देणे असे अनेक प्रकार समोर येत आहेत.
महापालिकेने स्पष्ट केले आहे की, खोटी कागदपत्रे दाखवून मिळकतकर चुकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोणतीच सूट दिली जाणार नाही.त्यामुळे मिळकतकरधारकांनी आपली कागदपत्रे आणि नोंदी योग्य असल्याची खात्री करून घ्यावी, नाहीतर कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते.