धर्मांतर प्रकरणातील निदा खानच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहणार, इम्तियाज जलील यांच्याकडून पाठराखण

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर : नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिची पाठराखण एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पाठराखण केली आहे. पूर्ण ताकदीनिशी तिच्या पाठीशी उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Nida Khan

जलील म्हणाले, प्रस्तुत प्रकरणातील मुलीने आम्हाला संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली. मी स्वतः एफआयआर वाचला. त्यात विशेष असे काहीच नाही. मी यापूर्वीच सदर तरुणीला तुझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मी तुझ्यासोबत उभा राहणार नाही असे सांगितले आहे. पण या प्रकरणात तिने जे सांगितले त्यानुसार सर्वकाही झाले असेल, तर मी तिच्यासोबत प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने उभा राहीन.



टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. ती एमआयएमच्या एका स्थानिक नगरसेवकाने खरेदी केलेल्या घरात राहत होती. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणाचा संबंध थेट इम्तियाज जलील यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकारांनी जलील यांना छेडले असता आपण मंत्री संजय शिरसाट यांच्या आरोपांना काडीमात्र भाव देत नसल्याचे नमूद करत प्रस्तुत प्रकरणात आपण पोलिसांना सहकार्य करत असल्याचे स्पष्ट् केले.

इम्तियाज जलील म्हणाले, एखाद्या व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर ती व्यक्ती त्याच्यावरील आरोप कोर्टात सिद्ध होईपर्यंत निर्दोष असते. हा कायद्याचा नियम आहे. म्हणजे माझ्यावर कुणीतरी आरोप केला, तर मी दोषी किंवा गुन्हेगार ठरत नाही. अशा प्रकारचे आरोप होतच असतात. पण मला विश्वास आहे की, या प्रकरणात नाशिक पोलिस नियमाप्रमाणे करतील. निदा खान किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला कोर्टात जाऊन जामीन मागण्याचा अधिकार आहे. ही कायदेशीर तरतूद आहे. जामीन याचिका सेशन कोर्टात रिजेक्ट झाली, तरीही व्यक्ती दोषी ठरत नाही. त्याच्याकडे वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार असतो.

Will stand with full force behind Nida Khan in the conversion case, backed by Imtiaz Jaleel

महत्वाच्या बातम्या