विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunetra Pawar राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि अस्वस्थतेच्या चर्चांना आता अधिकच जोर आला आहे. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी देवगिरी बंगल्यावर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जात नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची भावना पक्षात निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.Sunetra Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांची ही महत्त्वपूर्ण बैठक देवगिरी बंगल्यावर पार पडली. आगामी विधान परिषद निवडणुका, पक्षाची पुढील रणनीती आणि संघटनात्मक बदल यावर या बैठकीत चर्चा झाली. मात्र बैठकीत सर्वाधिक चर्चा अर्थखात्याच्या मुद्द्यावर झाल्याचे समजते. अजित पवार यांच्याकडे अर्थखाते असताना पक्षाला सरकारमध्ये महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे त्याच परंपरेनुसार अर्थखाते राष्ट्रवादीकडेच राहावे, अशी पक्षाची अपेक्षा होती. मात्र वारंवार मागणी करूनही भाजपकडून हे खाते दिले जात नसल्याने सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.Sunetra Pawar
या बैठकीतील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची गैरहजेरी. पटेल मुंबईत उपस्थित असूनही बैठकीला आले नाहीत. त्यामुळे पक्षातील नाराजी अधिक तीव्र झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या काही निर्णयांबाबत पक्षातील ज्येष्ठ नेते आधीपासून नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच पटेल यांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना वाव मिळाला आहे.
बैठकीदरम्यान ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी पक्षातील काही मुद्द्यांवर तीव्र खंत व्यक्त केली. “माझ्यावर आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका होत असताना पक्षातील इतर कोणीही आमच्या समर्थनासाठी पुढे येत नाही. अजितदादांच्या निधनानंतर आम्ही दोघेच पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, मग आम्हीच टीकेचे धनी का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तटकरे यांच्या या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी आक्षेप घेत “जे झाले ते सोडून आता पुढे जाऊया,” असा सल्ला दिला. याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये बैठकीत जोरदार खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, तटकरे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना कोणताही वाद झालेला नसल्याचे स्पष्ट केले. “बैठकीदरम्यान समितीच्या बैठकीसाठी वारंवार फोन येत होते. त्यामुळे मुद्द्याचे पटकन बोला असे मी म्हटले. कुठलीही खडाजंगी झालेली नाही. पक्षात कुठलाही फुटीचा प्रश्न नाही. आम्ही सर्व एक आहोत,” असे भुजबळ म्हणाले.
अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची सूत्रे गेली असली तरी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याची भावना दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये वाढत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्यासह काही आमदारांनी थेट शरद पवार यांची भेट घेतल्यानेही पक्षातील अस्वस्थता अधोरेखित झाली होती.
NCP upset over finance portfolio? Sunetra Pawar openly expresses displeasure at Devgiri meeting
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश