महाविकास आघाडी विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार, दोन दिवसात अंतिम निर्णय, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा व नागपूरच्या एका जागेवरील पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा आज टिळक भवनमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीने जागा वाटपाचा निर्णय जाहीर करु, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.



बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा लोकशाही मानत नाही, त्यांनी निवडणुकीत घोडेबाजार मांडला आहे, पैसा फेक तमाशा देख चा दुसरा अंक सुरु झाला असून ५ लाख रुपये आगाऊ देऊन नगरसेवकांची पळवापळवी केली जात आहे, अशा परिस्थितीत लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडी एकजूटपणे विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहे. मविआमध्ये जागा वाटपावरून कोणताही विसंवाद अथवा तिढा नाही तर सुसंवाद आहे, तर दुसरीकडे गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्येच जागा वाटपावरून धुसफुस सुरु आहे, असेही सपकाळ म्हणाले..
कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव द्यावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे महाविकास आघाडीने मोठे आंदोलन केले, तीन तास रास्ता रोको करण्यात आला. भाजपा महायुती सरकारने पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला पण शेतकऱ्यांची एकजूट व ताकदी पाहून फडणवीस सरकार हादरले म्हणूनच आज तातडीने दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत कांदा प्रश्नावर बैठक होत आहे पण या बैठकीतून रिकाम्या हाताने परत येऊ नका, शेतकऱ्यांसाठी भरीव मदत घेऊनच या, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

MVA to Contest All 17 Legislative Council Seats, Final Decision in Two Days: Harshvardhan Sapkal

महत्वाच्या बातम्या