विशेष प्रतिनिधी
मुंबई : Laxman Hake ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर आणि राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करत सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. जरांगे यांचे उपोषण हे सामाजिक न्यायासाठी नसून काहींचे राजकीय समीकरण मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले नियोजित आंदोलन होते, असा दावा त्यांनी केला. Laxman Hake
लक्ष्मण हाके म्हणाले की, “मनोज जरांगे उन्हात बसले म्हणून सरकारने तातडीने हालचाली केल्या. मात्र ही शासनाची संवेदनशीलता किंवा तत्परता नव्हती, तर सरकारची लाचारी होती. ओबीसी समाजाच्या वेदना, प्रश्न आणि आंदोलनांकडे सरकारने कधीच गांभीर्याने पाहिले नाही. मात्र जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सरकारने दाखवलेली घाई अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.” Laxman Hake
यावेळी त्यांनी सरकारच्या प्रतिनिधींच्या भूमिकेवरही निशाणा साधला. “उपोषणस्थळी मनोज जरांगे वारंवार आमदार प्रसाद लाड यांचा अपमान करत होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत होते. तरीही सरकारकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे हे सरकार किती लाचार आहे, हे महाराष्ट्राने पाहिले,” असे हाके म्हणाले.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही दबाव स्वीकारला जाणार नसल्याचा इशारा देताना त्यांनी सांगितले की, “जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून जात पडताळणी समिती किंवा प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तर ओबीसी समाज त्याला प्रचंड विरोध करेल. आरक्षण आणि जात प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत कायद्याचे पालन झाले पाहिजे. कोणत्याही समाजाला केवळ संख्येच्या बळावर आरक्षण किंवा प्रमाणपत्रे देता येणार नाहीत.”
सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर घेतलेल्या निर्णयांबाबतही हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आरोप केला की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल अशा कोणत्याही हालचाली समाज सहन करणार नाही. “ओबीसींच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभे राहील. सरकारने सामाजिक संघर्ष निर्माण करणारे निर्णय घेऊ नयेत,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना हाके यांनी इशारा दिला की, “जर संख्येच्या आधारे किंवा राजकीय दबावाखाली जात प्रमाणपत्रे दिली जाणार असतील, तर त्याविरोधात तीव्र भूमिका घेतली जाईल. सरकारने नवीन कायदे करून ओबीसींच्या हक्कांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर राज्यभर मोठे आंदोलन उभारले जाईल.”
Laxman Hake warns of massive agitation if OBCs are wronged; attacks Manoj Jarange’s movement
महत्वाच्या बातम्या