छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात महायुतीत बंडाचे संकेत? अब्दुल सत्तार यांच्या पुत्राचा विधानपरिषदेसाठी अर्ज

 

छत्रपती संभाजीनगर : विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

या मतदारसंघात महायुतीच्या जागावाटपात जागा भाजपच्या वाट्याला गेली असून भाजपने सुहास शिरसाट यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास अवघा काही वेळ शिल्लक असताना समीर सत्तार यांच्या नावाने अर्ज दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, समीर सत्तार स्वतः उपस्थित नसताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा अर्ज दाखल केला.

छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदा जागावाटपात ही जागा भाजपला देण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर आता थेट अब्दुल सत्तार यांच्या पुत्राने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केल्याने महायुतीत बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.



या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, “आधी आमची जिल्हा परिषद घेतली, महापालिका घेतली आणि आता विधानपरिषदही घेतली. पुढे पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीही घेणार का? आम्हाला सत्तेतून हद्दपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही गंभीर परिस्थिती आहे. आमच्या नेत्यांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचली नाही तर पश्चिम बंगालमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली, तशी महाराष्ट्रात होऊ नये, अशी भीती वाटते. मराठवाड्यातील परिस्थिती पाहून मला आणि कार्यकर्त्यांना दुःख होते.”

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. सावे म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या आदेशाला डावलून जर कोणी काही करत असेल, तर ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एखाद्या पक्षाच्या आमदाराला हे शोभणारे नाही. जिल्हा परिषद निवडणुकीवेळीही त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती. मात्र त्यांच्या मतदारसंघातही भाजपचे उमेदवार मोठ्या प्रमाणात विजयी झाले होते.”

या मतदारसंघात आता एमआयएमनेही उमेदवार उभा केला आहे. तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार मैदानात उतरणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून असल्याने समीर सत्तार आपला अर्ज मागे घेतात की निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवतात, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Abdul Sattar’s son files Council nomination

महत्वाच्या बातम्या