Ambadas Danve : विषारी दारूकांडात अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ambadas Danve हडपसर, फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा तसेच या घटनेस जबाबदार असलेल्या पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे.Ambadas Danve

दानवे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, संबंधित भागांमध्ये अवैध दारूविक्रीचे अड्डे अनेक वर्षांपासून सुरू होते. तरीही पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपींसह संबंधित विभागातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करताना दानवे यांनी या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणीही केली आहे. तसेच मिथेनॉलसारखे घातक रसायन राज्यात कसे पोहोचले, त्याचा पुरवठा कोणी केला आणि त्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.Ambadas Danve



“ही घटना केवळ विषारी दारूमुळे झालेली दुर्घटना नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे घडलेली मानवी हत्या आहे,” असा गंभीर आरोप करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी दानवे यांनी केली.

वृक्षारोपण निविदांवरही प्रश्नचिन्ह

दरम्यान, अंबादास दानवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वृक्षारोपण आणि संगोपन कामांच्या निविदा प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. छत्रपती संभाजीनगर आणि जालना विभागातील वृक्षारोपण व संगोपन प्रकल्पांच्या निविदांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रेनबो ग्रीनर्स या संस्थेला पात्र ठरविण्याच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत, प्रत्यक्ष कामासाठी तीन महिन्यांचा कालावधी नमूद असताना बिड कॅपॅसिटी निश्चित करताना कोणते निकष वापरण्यात आले, तसेच संस्थेला तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरविताना कोणत्या कागदपत्रांचा आधार घेण्यात आला, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

स्वतंत्र चौकशीची मागणी

संपूर्ण निविदा प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित निविदांवरील पुढील प्रशासकीय कार्यवाही स्थगित ठेवण्याचा विचार करावा, अशी मागणी दानवे यांनी केली. चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

विषारी दारूकांड आणि निविदा प्रक्रियेतील कथित अनियमितता या दोन्ही मुद्द्यांवर राज्य सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.

Ambadas Danve seeks murder charges against officials in Pune hooch tragedy

महत्वाच्या बातम्या