विशेष प्रतिनिधी
मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण, विकास आणि जंगलतोड या मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या दीर्घ पोस्टमधून त्यांनी गेल्या काही वर्षांतील अतिवृष्टी, वाढते तापमान, पर्यावरणीय हानी आणि जंगलांच्या ऱ्हासाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच सरकारने उद्योगपतींसाठी मोठ्या प्रमाणावर जंगल जमीन उपलब्ध करून दिल्याचा गंभीर आरोपही केला. Raj Thackeray
राज ठाकरे यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या काळात गेल्या ११ वर्षांत जवळपास १,७३,९८४ हेक्टर इतकी जंगल जमीन ही खाणी, रस्ते इत्यादींसाठी देऊन टाकली. आणि हे सगळं यांच्या लाडक्या एकुलत्या एक अदानी उद्योगसमूहासाठीच केलं. जेंव्हा देशाचे पंतप्रधान हे पर्यावरण बदलावर मन की बात मध्ये बोलतात तेंव्हा त्यांच्या मनातील खरी गोष्ट ही जंगलांचं, झाडांचं काही का होईना आम्हाला दोन तीन उद्योगपतींनाच मोठं करायचं आहे हीच असते. १७३९८४ हेक्टर म्हणजे किती याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. १.७३ लाख हेक्टर म्हणजे १७३० स्क्वेअर किलोमीटर. आपल्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे १०४ स्क्वेअर किलोमीटरचं. ज्याच्यावर आख्ख्या मुंबई आणि परिसराचं भवितव्य अवलंबून आहे. १७३० स्क्वेअर किलोमीटर जंगलाची जमीन गेली म्हणजे साधारणपणे १६ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानं नष्ट झाली.
पर्यावरण दिन हा केवळ झाडे लावण्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यापुरता मर्यादित राहू नये. राज्य आणि देशासमोर उभ्या राहिलेल्या पर्यावरणीय संकटाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मागील वर्षीच्या अतिवृष्टीपासून ते यंदाच्या विक्रमी उष्णतेपर्यंतच्या घटनांनी पर्यावरण बदलाचे गंभीर परिणाम स्पष्ट केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
विकासाच्या नावाखाली रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांची उभारणी होत असली तरी त्यात पर्यावरणाचा विचार होत नसल्याची टीका करत त्यांनी शहरांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका पावसात शहरांची दाणादाण उडते, तर उन्हाळ्यात ग्रामीण भागात सकाळी १० नंतर शेतात काम करणे कठीण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे म्हणाले, अतिउष्णतेमुळे देशाच्या उत्पादकतेला अब्जावधी डॉलर्सचा फटका बसत असल्याचे तसेच पर्यावरण बदलामुळे देशाच्या जीडीपीवरही परिणाम होऊ शकतो. पर्यावरण हा आता केवळ निसर्गप्रेमींचा विषय राहिलेला नसून अर्थव्यवस्था, शेती, आरोग्य आणि शहरांच्या भवितव्याशी संबंधित विषय बनल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणांनी सोशल मीडियावरील आकर्षणापेक्षा पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यांवर आवाज उठवावा, शहरांमधील हिरवळ, नद्या आणि सार्वजनिक जागा जपण्यासाठी प्रशासनाला जबाबदार धरावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
पर्यावरणाचे संरक्षण केले नाही तर पुढील पिढ्यांना झाडांविना शहरे, प्रदूषित नद्या आणि असह्य उष्णतेचा सामना करावा लागेल, असा इशारा देत त्यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली.
राज ठाकरे खंत व्यक्त करताना म्हणाले, आपण निसर्गपूजक समाज होतो. तो निसर्गपूजक समाज निसर्गविनाशक कधी झाला हेच कळत नाही. आज कोकणात देवराया टिकल्यात कारण त्या तिथल्या निसर्गपूजक परंपरेने टिकवल्यात म्हणून. जोपर्यंत आपण आपल्या मूळच्या धारणेकडे जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पर्यावरण इत्यादीवर बोलणं, भांडणं हे मूठभर निसर्गप्रेमींचं काम होतं असं आपण मानायचो. पण तो आता तो अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा, शेतीचा आणि शहरांच्या भवितव्याचा विषय बनला आहे.
निसर्गातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला असे काही विळखा घालून बसलेत की जर आजच काही केलं नाही तर यातून तुम्ही तर सोडाच, पुढच्या पिढ्या पण निसटू शकणार नाहीत. आपल्या पुढच्या पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार आहोत? झाडांशिवाय शहरांचा? नदीऐवजी गटारं झालेल्या नद्यांचा ? उन्हाळ्यात घराबाहेर न पडता येणाऱ्या गावांचा? की जगातील सर्वोत्तम शहरांशी स्पर्धा करणारी, हिरव्यागार, सुंदर आणि जगण्यालायक शहरं आणि गावांचा ? याचा विचार आजतरी करायला सुरुवात करायला हवी. आणि हे केलं तरच हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला म्हणता येईल.
Raj Thackeray attacks Centre on World Environment Day
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन