SIR duty : एसआयआरच्या कार्यक्रमासाठी रुजू न झालेल्या बीएलओंविरोधात पोलिसांत दाखल करणार गुन्हा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : SIR duty  भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत बृहन्मुंबई क्षेत्रात मुंबई शहर आणि उपनगरे कार्यवाही सुरू आहे. तरीही, या कामकाजासाठी नेमणूक करण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी वारंवार सूचना देऊनही अद्याप रुजू झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे, रुजू न झालेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर संबंधित स्थानिक पोलिस स्थानकांत गुन्हा दाखल करावा, असे निर्देश सर्व अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिले आहेत. तसेच, १३ आणि १४ जून २०२६ रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.SIR duty



मुंबईत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज दिनांक ११ जून २०२६ बैठक आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (शहर) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी (मुंबई उपनगर जिल्हा) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार, जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी आंचल गोयल आदी यावेळी उपस्थित होते. तर, मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचे निवडणूक नोंदणी अधिकारी आणि संबंधित अधिकारी आदींचीही यावेळी उपस्थिती होती.

अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन शर्मा यावेळी म्हणाले की, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात मॅपिंग, तार्किक विसंगती आणि बीएलओंची अनुपस्थिती हे अत्यंत संवेदनशील मुद्दे आहेत. विहित वेळेत ही संपूर्ण प्रक्रिया योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे. या कामकाजात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हयगय होता कामा नये. त्यामुळे, सर्व निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करावी. १३ आणि १४ जून २०२६ रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण आयोजित करावे. सर्व निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी त्यांना प्रशिक्षित करावे. जेणेकरुन, विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल, असेही शर्मा म्हणाले.

अतिरिक्त आयुक्त (शहर) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अश्विनी जोशी म्हणाल्या की, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमासाठी मुंबई महानगरपालिकेकडून ७ हजार ३०० कर्मचारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमले आहेत. तसेच, सुमारे १ हजार अतिरिक्त कर्मचारीही दिले आहेत. यासोबतच, वस्तू व सेवा कर विभाग, आयकर विभाग, मुंबई विद्यापीठ, खाजगी विना अनुदानित शाळेचे शिक्षक आणि राज्य शासनाच्या विविध विभागांतील कर्मचारीही नेमण्यात आले आहेत. तरीही, मोठ्या प्रमाणात कर्मचारी रुजू झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे, रुजू न झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. त्यांच्यावर तत्काळ पोलिसांत गुन्हा नोंदवावा, असे निर्देश जोशी यांनी दिले.

FIRs to be filed against BLOs skipping SIR duty

महत्वाच्या बातम्या