सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानाने गेल्या होत्या ! सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली चिंता

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सुनेत्रा वहिनींनी प्रवास केलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जर खरी असेल, तर मला नक्कीच वहिनींची, पार्थची आणि तटकरेंची काळजी वाटते. सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानाने गेल्या होत्या की नाही, याची मला पूर्ण कल्पना नाही, असे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुंबईहून दिल्लीला जाताना ‘व्हीएसआर ऑपरेटिंग कंपनी’च्या विमानाने प्रवास केल्याचे वृत्त समोर आले होते. या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाणाला दोन तास उशीर झाला होता. अजित पवार यांचा याच कंपनीच्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या: “सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानाने गेल्या होत्या की नाही, याची मला पूर्ण कल्पना नाही. पण जर असे झाले असेल आणि विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल, तर तो अत्यंत चिंताजनक विषय आहे. मी नेहमीच कोणत्याही प्रवास साधनाच्या सुरक्षेबद्दल संसदेत सातत्याने आवाज उठवत असते. त्यामुळे मला वहिनींची आणि सोबत असलेल्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. व्हीएसआर कंपनीबद्दल आरोपप्रत्यारोप होत राहतात. पण दोन-तीन महत्त्वाचे मु्द्दे आहेत. सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानाने गेल्यात की नाही मला माहिती नाही. कारण पंतप्रधान मोदींनी कमी खर्चाचे आवाहन केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अजुनही खासगी विमानाने किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करते की नाही याची माहिती नाही.”



सुप्रिया सुळे म्हणाल्या, “खासगी विमान, हेलिकॉप्टर यांच्या मेन्टेनन्सचा वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे. अजितदादांच्या ज्याप्रकारे अपघात झाला, त्याची अनेक उत्तरे अजुनही आमच्याकडे नाहीयेत. एक बहीण म्हणून त्याची उत्तरे मला हवी आहेत. आज नाही उद्या, पण उत्तरे हवी आहेत. ही उत्तरे आम्ही संसदेत नेहमी मागतो. कारण अजितदादा माझा फक्त भाऊ नव्हता, तर या राज्याचा उपमुख्यमंत्री होता. विमानाच्या मेन्टेनन्सचा प्रॉब्लेम होता का? असेल तर त्याला जबाबदार कोण? याची उत्तरे द्यावीच लागतील. आज माझा भाऊ गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरावर असा दिवस येऊ नये.”

माध्यमांमधून सातत्याने अशी माहिती मिळतेय की, सर्व शिक्षा अभियानाचा आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जातो. हे अतिशय चिंताजनक आहे. ही गोष्ट मी आज नाही, तर गेले दोन अडीच वर्षापासून म्हणतेय की, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे.राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व अर्थतज्ज्ञांना बोलवा. त्यांचे मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्राचे आर्थिक धोरण ठरवले गेले पाहिजे. देशातील आर्थिक परिस्थिती देखील अतिशय अडचणीत आहे. मी वारंवार पंतप्रधानांना विनंत केली की, सर्व पक्षीय बैठक बोलवा आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करूया. कारण देश टिकला, तरच बाकी सगळे टिकतील, असा सल्ला सुळे यांनी दिला.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ‘अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाली होती’ असा एक मोठा दावा केला होता. या दाव्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली ही माहिती मी देखील ऐकली आहे. या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, नक्की काय घडले किंवा त्यांना कोणी काय माहिती पुरवली, या संदर्भात मी स्वतः संजय राऊत यांना फोन करणार आहे आणि त्यांच्याकडून या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहे.”

Sunetra Vahini Had Indeed Travelled on That Flight, Supriya Sule Expresses Concern

महत्वाच्या बातम्या