विशेष प्रतिनिधी
मुंबई : Salman Khan समाजमाध्यमांवर काहीही लिहिण्याची मोकळीक असणं याचा अर्थ एका व्यक्तीला दुसऱ्याची बदनामी करण्याचा परवाना मिळाला असा होत नाही. या शब्दांत हायकोर्टानं सलमान खानच्या पनवेलमधील फार्म हाऊसच्या शेजाऱ्याला खडसावलं. केतन कक्कड यांनी सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्ट आणि व्हिडिओ डिलीट करण्याबाबत विचार करावा, अन्यथा आम्हाला योग्य ते आदश द्यावे लागतील. असे निर्देश देत न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी आज या प्रकरणाची सुनावणी 6 जुलैपर्यंत तहकूब केली.Salman Khan
सलमान खान आणि त्याच्या कुटुबीयांविरोधात सोशल मीडियावर केलेली वक्तव्यं ही बदनामीकारक आणि जातीय तेढ निर्माण करणारी होती, असा दावा सलमान खानच्या वतीनं 2022 मध्ये दाखल झालेल्या या याचिकेतून मुंबई हायकोर्टात करण्यात आला. पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊसजवळच असलेल्या भूखंडाचे मालक केतन कक्कड यांनी एका यूट्युब चॅनलच्या माध्यमातून केलेल्या बदनामीविरोधात सलमाननं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारच्या अपमानकारक व्हिडिओला ब्लॉक करत तत्काळ हटवून टाकावं, असे अंतरिम आदेश देण्याची विनंती सलमाननं हायकोर्टाकडं केली आहे. यापूर्वी सलमानची हीच मागणी मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावली होती, ज्याला सलमाननं हायकोर्टात आव्हान दिलं. या व्हिडिओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करताना ट्विटर, फेसबुक, यूट्युब आणि गुगललाही सलमाननं यात प्रतिवादी केलं होतं. या याचिकेवर न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठासमोर आज सुनावणी पार पडली.Salman Khan
या सुनावणीत सलमानच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती देशमुख यांनी लोकांकडून सोशल मीडियाचा एकंदरीत होत असलेल्या गैरवापराबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर काहीही बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची खुलेआम बदनामी करण्याचा परवाना, असं लोकांनी अर्थ घेऊ नये. कक्कड यांनी सलमान खानबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर हटवण्याबाबत विचार करावा. अन्यथा आम्हाला योग्य ते आदेश द्यावे लागतील, अशी सूचना करत या प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यांकरता तहकूब केली.
केतन कक्कड यांनी व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्टवरून केलेले आरोप हे खोटे, अपमानास्पद आणि बदनामी असून त्यामुळे सलमान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना हकनाक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा याचिकेतून केला गेलाय. मुळात सलमान आणि एनआरआय असलेल्या कक्कडमध्ये जागेच्या अतिक्रमणावरून वाद आहे. मात्र त्या रागातून कक्कड यांनी केलेले हे सर्व आरोप वैयक्तिक पातळीवरचे आहेत. चाईल्ड ट्रॅफिकिंग, ड्रग ट्रॅफिकिंग, बलात्कार, सुशांत सिंहला ठार मारले, अंडरवर्ल्डशी संबंध, लँड माफिया, दहशतवादी तसेच पनवेलच्या या फॉर्म हाऊसमध्ये अनेकांचे मृतदेह गाडले गेलेत असे एक ना अनेक आरोप कोणताही पुरावा नसताना कक्कड यांच्याकडनं केले गेलेत.
केतन कक्कड यांचे व्हिडिओ हे काल्पनिक असून केवळ बदनामीकारकच नाही तर सलमान खानविरोधात लोकांमध्ये जातीयदृष्ट्या तेढ भडकवणाराही आहेत, असा दावा या याचिकेतून करण्यात आलाय. तसेच अल्पसंख्याक समुदायाचा सदस्य असलेला सलमान त्याच्या फार्महाऊसजवळील गणेश मंदिर बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याचंही कक्कड म्हणाले आहेत. एकीकडे अयोध्येत मंदिर उभारण्यासाठी 500 वर्षे लागली तर इथे सलमान खान एक गणेश मंदिर बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. असा उल्लेख करत कक्कड यांनी सलमानची तुलना थेट बाबर आणि औरंगजेबशी केल्याचा आरोप करण्यात आलाय. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर शेकडो लोकांनी सलमानविरोधात सोशल मीडियावर शेरेबाजी केल्याची माहितीही कोर्टाला देण्यात आलीय. इतकंच नव्हे तर सलमान खान हा अंल्डरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा करत सलमान त्याच्या फार्महाऊसमधून अंमली पदार्थ, अवयव आणि मुलांच्या तस्करीचा व्यवसायही चालवत असल्याचा आरोप केतन कक्कड यांनी या व्हिडिओतून केला होता.
Bombay HC warns Salman Khan’s NRI neighbour over defamatory social media posts
महत्वाच्या बातम्या