विशेष प्रतिनिधी
मुंबई : वारसा, अधिवास तसेच उत्पन्न प्रमाणपत्रांच्या वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहारावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली असून संबंधित प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे आणि महसूल अधिकारी नागनाथ लोलेवार यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात संबंधित अधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्यांचा गैरवापर करून आपले सरकार पोर्टल आणि सेतू केंद्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत हजारो वारसा, अधिवास आणि उत्पन्न प्रमाणपत्रे जारी झाल्याने महसूल विभाग सतर्क झाला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत महसूल विभागाने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. संशयास्पद प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू असून आतापर्यंत तपासलेल्या अनेक प्रमाणपत्रांमध्ये अनियमितता आढळल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महसूलमंत्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
तपास यंत्रणा बेकायदेशीररीत्या जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या, त्यामागील नेटवर्क आणि डिजिटल प्रणालीचा गैरवापर कसा झाला याचा शोध घेत आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Revenue Minister cracks down on illegal certificate scam in Mumbai : Bawankule
महत्वाच्या बातम्या