महापालिकेच्या शाळांसाठी निधी निर्णयावर ‘आप’चे आंदोलन; सभागृहात घोषणाबाजीने खळबळ

विशेष प्रतिनिधी

पुणे : महापालिकेच्या शाळांचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘आकांक्षा एज्युकेशन फाऊंडेशन’ला आर्थिक मदत देण्याच्या स्थायी समितीच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाने बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार आंदोलन केले. प्रेक्षक गॅलरीतून घोषणाबाजी आणि पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे काही काळ सभागृहातील कामकाजावर परिणाम झाला. सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. AAP protests

महापालिकेच्या काही शाळा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर खासगी संस्थांकडे सोपविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आकांक्षा एज्युकेशन फाऊंडेशन ही संस्था परकीय कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीच्या साहाय्याने शाळांचे व्यवस्थापन करत आहे. मात्र, उपलब्ध सीएसआर निधी अपुरा पडत असल्याचे कारण देत संस्थेने प्रति विद्यार्थी सुमारे २५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. या मागणीला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर आम आदमी पक्षाने त्यास तीव्र विरोध दर्शविला.



सर्वसाधारण सभा सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून ‘महापालिकेच्या शाळा वाचवा’, ‘खासगीकरण थांबवा’ आणि ‘दिल्ली-पंजाब मॉडेल लागू करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांनी हातात फलक घेत निषेध नोंदविला. काही आंदोलकांनी निषेध व्यक्त करताना काचेवर डोके आपटल्याने वातावरण अधिकच तापले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

सभागृह नेते गणेश बिडकर यांनी हे आंदोलन नियमबाह्य असल्याचे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर काँग्रेसचे अरविंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम यांनी आंदोलकांची बाजू ऐकून घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारण्याची भूमिका मांडली. महापौरांनीही आंदोलकांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवित त्यांचे म्हणणे समजून घेण्याची आवश्यकता व्यक्त केली.

यानंतर सभागृहाबाहेर झालेल्या चर्चेदरम्यान गणेश बिडकर यांनी आंदोलकांना निवेदन सादर करण्याचे आवाहन केले. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांत झाले.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी प्रशासनाला प्रेक्षक गॅलरीतील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले. गॅलरीतून फोटो किंवा व्हिडिओ चित्रीकरण होणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगतानाच आंदोलन सुरू असताना सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करत होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या आंदोलनामागे विरोधी पक्षाची फूस असल्याचा आरोप सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केला. मात्र, आंदोलकांना लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असल्याचे मत विरोधी पक्षनेते ॲड. नीलेश निकम आणि काँग्रेसचे अरविंद शिंदे यांनी व्यक्त केले.

AAP protests civic school funding decision; slogan-shouting sparks uproar in house

 

महत्वाच्या बातम्या