Sanjay Raut : गद्दारांना जनता धडा शिकवेल; संजय राऊतांचा फुटलेल्या खासदारांवर हल्लाबोल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांवर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करत त्यांना जनतेसमोर पुन्हा निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. शिवसेनेने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले, मात्र पक्ष संकटात असताना काही जणांनी साथ सोडल्याचा आरोप त्यांनी केला.Sanjay Raut

भांडुप येथे आयोजित मेळाव्यात बोलताना राऊत म्हणाले की, संबंधित खासदार मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी मतदारांचा विश्वासघात केला असून, नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जाण्याची हिंमत दाखवावी.Sanjay Raut



राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावरही टीका करत शिवसैनिकांनी त्यांना प्रेम, सन्मान आणि राजकीय संधी दिली, मात्र पक्ष अडचणीत असताना त्यांनी साथ सोडली, अशी खंत व्यक्त केली. अशा कृतीची इतिहासात गद्दारी म्हणून नोंद होईल, असेही ते म्हणाले.

राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “जर तुम्ही स्वतःला टायगर म्हणत असाल, तर आम्हीही लढण्यासाठी तयार आहोत. शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप आहे आणि त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसेल.”

ईशान्य मुंबईतील पुढील खासदार हा शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पक्षाशी आणि मराठी माणसाशी बेईमानी करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल, असे सांगितले.

राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असून, ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sanjay Raut launches blistering attack on rebel MPs

महत्वाच्या बातम्या