Shashikant Shinde : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नाही, पक्षबांधणीवर भर देणार अल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

पुणे : Shashikant Shinde आम्ही काँग्रेससोबत जाणार आहोत किंवा पक्षाचे विलिनीकरण होणार आहे, अशा चर्चांना कोणताही आधार नाही. आमचा पक्ष सक्षमपणे काम करत आहे. आमचे कार्यकर्ते कुठेही जाणार नाहीत. विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी सांगत काँग्रेसमध्ये विलिनीकरण किंवा पक्ष काँग्रेससोबत जाणार असल्याच्या चर्चांना स्पष्टपणे फेटाळून लावले.Shashikant Shinde

पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असून, जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीत लवकरच बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.Shashikant Shinde

पक्षाच्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्हा कार्यकारिणीची संघटनात्मक बैठक निसर्ग मंगल कार्यालयात शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस रवी वरपे, रवी पवार, माजी आमदार ॲड. जगन्नाथ शेवाळे, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष विजय कोलते, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पक्षबांधणीसाठी राज्यभर बैठका सुरू असून, १५ ऑगस्टपासून पक्षाचे खासदार आणि आमदार महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.Shashikant Shinde



सध्या कोणत्याही निवडणुका नसल्याने संघटनात्मक बांधणीसाठी हाच योग्य काळ आहे. २०२९ पर्यंत पक्षाला अधिक सक्षम आणि ताकदीने उभे करण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वीकारावी,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिंदे म्हणाले की, जिल्हा आणि राज्य कार्यकारिणीत लवकरच आवश्यक बदल करण्यात येतील. संघटन अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यावर भर दिला जाईल. पक्षाच्या विलीनीकरणाबाबत किंवा पक्षातील नेते-कार्यकर्ते बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना कोणताही आधार नाही. अशा अफवांवर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये.

मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार

उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर रविवारी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षही सहभागी होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “राम मंदिराच्या नावावर भाजप राजकारण करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राम मंदिर निधीबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न गंभीर आहेत. धर्माच्या नावावर पैसे कमावण्याचा हा नवा उद्योग झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

विकासकामांच्या दर्जावर प्रश्न

राज्यातील विकासकामांच्या दर्जावरही त्यांनी टीका केली. “राज्यात सर्वत्र सत्ता असतानाही निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. कंत्राटदारांना सांभाळण्याचे काम सुरू आहे. अनेक मोठी कामे मंजूर होत असली तरी त्याचा फायदा ठरावीक लोकांनाच दिला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.

गृहखाते अपयशी

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “गृहखाते राज्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. मुख्यमंत्री गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करतात; मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे,” असे ते म्हणाले.

अधिवेशनावरही टीका

विधानमंडळाच्या अधिवेशनावर टीका करताना शिंदे म्हणाले, “विरोधी पक्ष सातत्याने जनतेचे प्रश्न मांडत आहे. मात्र, मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत. अधिवेशन केवळ दिवस काढण्यासाठी चालविले जात असल्याचे चित्र आहे.”

दरम्यान, खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका स्पष्ट केल्याबाबत विचारले असता, त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली.

No Merger of Sharad Pawar’s NCP with Congress; Focus Will Remain on Strengthening Party, Says Shashikant Shinde

महत्वाच्या बातम्या