विशेष प्रतिनिधी
पुणे : छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुरंदर हा राज्य व केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे पुरंदर तालुका व पुणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार व उद्योग संधी उपलब्ध होणार आहेत. भूसंपादनासाठी प्रति एकर सुमारे 1.61 कोटींचा मोबदला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जाहीर केला. Purandar airport land acquisition
सरकारने वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी या सात गावांतील एकूण 1216.75 हेक्टर क्षेत्र भूसंपादनासाठी निश्चित केले आहे. उच्चाधिकार समितीच्या बैठकीत जमीन मोबदल्याच्या दरांना मंजुरी देण्यात आली असून प्रति हेक्टर मोबदल्यासह विविध घटकांचा विचार करून एकूण मोबदला निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार प्रति एकर सुमारे 1.61 कोटी रुपये मोबदला देण्यात येणार आहे.
याशिवाय जमीनधारकांच्या मालमत्तेतील घटक जसे की घर, विहीर, झाडे, बोअरवेल, पाइपलाइन यांचे स्वतंत्र मूल्यांकन करून त्या रकमेवर 100 टक्के दिलासा देण्यात येणार आहे. म्हणजेच संबंधित घटकांच्या मूल्याच्या दुप्पट रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे
फळझाडे व वनझाडांचे दरही निश्चित करण्यात आले असून आंबा झाडासाठी 50 ते 60 हजार, तर नारळासाठी 4 ते 6 हजार रुपयेपर्यंत मोबदला दिला जाणार आहे. विहिरींसाठी 3 ते 17 लाख रुपये, तर पक्क्या घरांसाठी क्षेत्रफळानुसार 3 ते 40 लाख रुपये मोबदला देण्यात येईल
संमती करार करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ देण्यात येणार आहेत. त्यामध्ये 750 दिवसांची मजुरी, अल्पभूधारकांसाठी 500 दिवसांची मजुरी, घर स्थलांतरासाठी 40 हजार रुपये आणि गोठा स्थलांतरासाठी 20 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
तसेच पुनर्वसन धोरणानुसार इच्छुकांना 10 टक्के विकसित भूखंड परतावा मिळू शकतो, मात्र त्यासाठी मोबदल्यातून तितकी रक्कम कपात केली जाईल.
प्रशासनाने मोबदला थेट खातेदारांच्या बँक खात्यात आरटीजीएस द्वारे (RTGS ) जमा करण्याची व्यवस्था केली असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, 3 मे 2026 पर्यंत 7 गावांमधून एकूण 244 संमतीपत्रे प्राप्त झाली असून सुमारे 174 हेक्टर क्षेत्रासाठी सहमती मिळाली आहे.
प्रशासनाने सर्व जमीनमालकांना निर्धारित कालावधीत संमतीपत्र व प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा सक्तीच्या भूसंपादन प्रक्रियेत काही लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
1.61 crore per acre compensation announced for Purandar airport land acquisition
महत्वाच्या बातम्या
- ‘मला खोटं गोवलं’ आरोपीचा दावा फेटाळला; नसरापूर प्रकरणात तपास अधिक तीव्र
- पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा ३१ मेपर्यंत सुरू होण्याची शक्यता…
- विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार, अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद
- टीसीएस बीपीओ प्रकरण: निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला, अटकेची टांगती तलवार