विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षीय बलाबलाच्या गणितात महायुतीचे स्पष्ट वर्चस्व दिसून येत आहे. एकूण ८२७ मतदारांपैकी तब्बल ७३४ मते भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या ताब्यात असल्याने महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालापेक्षा महायुतीला किती मताधिक्य मिळणार, याचीच राजकीय वर्तुळात अधिक चर्चा रंगू लागली आहे. BJP-Ajit Pawar
मतदारसंघातील एकूण मतदारांमध्ये ग्रामीण भागातील ५७० मतदारांचा (स्वीकृत सदस्यांसह) समावेश असून पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन शहरांतील मतदारांची संख्या ३०६ इतकी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदारांचे प्रमाण शहरांच्या तुलनेत जवळपास दुप्पट असल्याने त्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पक्षनिहाय मतदारसंख्येचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक ३४४ मते आहेत. त्यापैकी केवळ ६४ मते पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील असून तब्बल २८० मते ग्रामीण भागातील आहेत. भाजपकडे एकूण ३०५ मते असून त्यातील २०३ मते शहरी भागातील, तर १०२ मते ग्रामीण भागातील आहेत. याशिवाय शिवसेना (शिंदे गट) ६८, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १७, काँग्रेस १९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ११, अपक्ष २३ आणि इतर आघाडी समर्थक २३ मतदार आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीतील जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना या निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात भाजपची वाढती ताकद लक्षात घेता या जागेवर भाजपकडूनही दावा करण्यात आला होता. मात्र महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाने समन्वय साधत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपविल्याने संभाव्य अंतर्गत संघर्ष आणि बंडखोरी टळल्याचे मानले जात आहे.
इतिहासाचा आढावा घेतला असता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते आणि पिंपरी-चिंचवडचे ज्येष्ठ नेते प्रा. रामकृष्ण मोरे विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर २००३ मधील पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यानंतर २००४, २००९ (पोटनिवडणूक), २०१० आणि २०१६ या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देताना ग्रामीण भागातील नेतृत्वाला संधी न दिल्याची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. ग्रामीण भागातील मतदारसंख्या निर्णायक असतानाही नेतृत्वाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा या निवडणुकीतही चर्चेचा विषय ठरत आहे.
मतदारांची संख्या पक्षनिहाय
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ३४४
भारतीय जनता पार्टी.३०५
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १७
शिवसेना शिंदे गट ६८
शिवसेना उबाठा ११
काँग्रेस १९
अपक्ष २३
आघाडी २३
BJP-Ajit Pawar bloc commands 90% voter base; all eyes on Mahayuti’s winning margin
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चेनंतर मनोज जरांगेंनी उपोषण केले स्थगित
- Baramati : विधवा महिलेचा छळ, बारामतीत विद्यमान नगरसेवकावर गुन्हा दाखल
- Ghatkopar : घाटकोपर येथील पालिका मराठी शाळा वाचविण्यासाठी हजारोंचा जनआक्रोश
- मराठा आरक्षणाबाबत संविधानाच्या चौकटीत बसणारा निर्णय, ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन