कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत त्यांच्याकडून अश्रू ढाळण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा विराेधकांना टाेला

विशेष प्रतिनिधी

मुंबई :  विरोधकांच्या आंदोलनावर निशाणा साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही मंडळी फक्त राजकीय फायदा मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत. कांदा कापल्यानंतरही ज्यांच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, तेच आता अश्रू ढाळण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. CM Devendra Fadnavis

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बाेलताना कांदा व इंधन दरवाढीवरून आंदाेलन करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी हल्लाबाेल केला. ते म्हणाले, आपल्या सरकारला शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव असून, राज्य आणि केंद्र सरकार संवेदनशीलतेने काम करत आहे. 15 रुपयांनी कांदा खरेदीचा निर्णय यापूर्वी कोणी घेतला होता का, हे विरोधकांनी दाखवावं, असे आव्हानही त्यांनी दिले.



केंद्राने खरेदी दरात सुमारे 3.5 रुपयांची वाढ करत तो जवळपास 15 रुपयांपर्यंत नेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोठ्या प्रमाणात कांदा खरेदीही सुरू करण्यात आली. राज्य सरकारने केंद्राकडे विशेष बैठकीची मागणी केली होती आणि त्यानुसार उद्या सायंकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न या बैठकीत होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, पेट्रोलच्या मागणीत सरासरीपेक्षा 23 टक्के वाढ झाली असून, डिझेलची मागणी 52 टक्क्यांनी वाढली आहे. काही भागात तर इंधन पुरवठा 70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ही वाढ नैसर्गिक नसून काही ठिकाणी साठेबाजी सुरू असल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळे पुरवठा विभाग आणि गृह विभागाला संयुक्त कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यात सध्या इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवा आणि भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात अतिरिक्त इंधन खरेदी करत आहेत. त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोण साठेबाजी करत आहे, कोण अतिरिक्त इंधन खरेदी करत आहे, याचा तातडीने शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.

CM Devendra Fadnavis takes swipe at opposition

महत्वाच्या बातम्या