आमदार असूनही सभागृहात दांड्या; उद्धव ठाकरेंची ४ वर्षांत फक्त ४२ दिवस हजेरी

विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची धक्कादायक आकडेवारी समोर आली असून, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती केवळ ३१.५८ टक्के इतकी नोंदवली गेली आहे. २०२० मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार वर्षांत झालेल्या १३३ बैठकींपैकी फक्त ४२ बैठकींना हजेरी लावली आहे.
२०१९ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातील उपस्थितीची अधिकृत नोंद उपलब्ध नसली, तरी २०२२ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या सभागृहातील उपस्थितीत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. राजीनाम्यानंतर झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी केवळ एका बैठकीला उपस्थिती दर्शवली होती. तर २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही १६ बैठकींपैकी फक्त ४ बैठकींना ते उपस्थित होते.



सभागृहातील कामकाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह इतर काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सलग तीन अधिवेशनांमध्ये एकदाही सभागृहात हजेरी लावलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दुसरीकडे, काही आमदारांनी मात्र उपस्थितीचा आदर्श निर्माण केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांनी गेल्या सहा वर्षांतील १८ अधिवेशनांपैकी तब्बल १३ अधिवेशनांत १०० टक्के उपस्थिती नोंदवली आहे. राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनीही १८ पैकी ११ अधिवेशनांमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
याशिवाय मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर आणि सुधाकर आडबाले यांनीही अनेक अधिवेशनांत शंभर टक्के उपस्थिती राखत आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे.

MLA in name only? Uddhav Thackeray attended just 42 Council sessions in 4 years

महत्वाच्या बातम्या