बच्चू कडूंवर उद्धव ठाकरेंचा थेट हल्ला; “घरी बोलावून मंत्री केलं, ती माझी चूक”

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्यावर पहिल्यांदाच उघडपणे जोरदार टीका केली. “घरी बोलावून त्याला मंत्री केलं, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत, त्यांना जाऊ द्या,” अशा शब्दांत ठाकरे यांनी बच्चू कडूंवरील नाराजी व्यक्त केली. Uddhav Thackeray

मुंबईत प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांच्या ठाकरे गटाच्या शिवसेनेत झालेल्या पक्षप्रवेशावेळी त्यांनी हा हल्लाबोल केला. प्रहार संघटनेतील सोलापूर, परभणी आणि धाराशिवमधील अनेक कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षनेते अंबादास उपस्थित होते.



काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी त्यांचा प्रहार पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केला होता. त्यानंतर त्यांना विधान परिषदेची आमदारकीही मिळाली. मात्र, या निर्णयामुळे प्रहार संघटनेतील अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते. मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंवर उघडपणे टीका करत “आम्हाला विकून मिंधेसेनेत प्रवेश केला,” असा आरोप केला.

पक्षप्रवेशावेळी कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंविरोधात संताप व्यक्त केला. “आम्ही स्वाभिमानी आहोत, त्यामुळे ठाकरे साहेबांसोबत आलो,” असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही बच्चू कडूंवर निशाणा साधत, “आपल्यातून गेलेला माणूस जुना शिवसैनिक होता. त्याला मोठं करण्याची जबाबदारी आम्ही घेतली. पण काही लोक सत्तेच्या आणि पदाच्या मोहात अडकले,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याला शिंदे गटावरचा अप्रत्यक्ष टोला मानले जात आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे एकमेव आमदार होते. त्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बच्चू कडू गुवाहाटीला गेले आणि पुढे त्यांनी शिंदे गटासोबत राजकीय वाटचाल कायम ठेवली. अलीकडेच त्यांनी प्रहार पक्षाचे शिवसेनेत विलिनीकरण करत विधान परिषदेवर आमदारकी मिळवली. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

दरम्यान, बच्चू कडूंनी यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करत आपण कोणत्याही पदासाठी शिवसेनेत गेलेलो नसल्याचे सांगितले होते. “मला काही मागायचं असतं तर गुवाहाटीलाच मागितलं असतं. मी मंत्रिपदासाठी नाही, तर दिव्यांग मंत्रालयासाठी लढलो,” असे ते म्हणाले होते.

Uddhav Thackeray launches direct attack on Bacchu Kadu: “Making him a minister was my

महत्वाच्या बातम्या