विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : साखर कारखान्यांच्या अडीअडचणीत सरकार त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. पण आपत्तीकाळात शेतकऱ्यांसाठी आपण केवळ नफ्यातून ५ रुपये बाजूला काढा, अशी सूचना केली. त्यावर काही मंडळींनी गहजब सुरू केला आहे. काही लोक मनाने फार छोटे झाले आहेत. मी आता काही कारखाने शोधून काढले आहेत, जिथे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनात काटा मारला जातो. त्यांना आता दाखवतोच, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. Devendra Fadnavis
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील सहकारी साखर कारखान्याचे नूतनीकरण आणि लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील तसेच पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी लोणी अहिल्यानगार येथे पार पडले.यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य निधीसाठी प्रति टन १० रुपये आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ५ रुपये कर आकारण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाला काही कारखानदारांनी जोरदार विरोध केला. याचाच धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारखानदारांना इशारा दिला.
फडणवीस म्हणाले की, “केवळ ५ रुपये शेतकऱ्यांसाठी बाजूला काढा, असे सांगितले होते. फार तर २५ लाख एका कारखान्याला द्यावे लागले असते. मात्र, असा गहजब निर्माण केला गेला की, शेतकऱ्यांकडूनच पैसे काढून घेतले जात आहेत. मी आता काही कारखाने शोधून काढले आहेत, जिथे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वजनावेळी काटा मारला जातो. त्या कारखान्यांना मी आता पाहतोच. कारखान्याचे मालक शेतकरी आहेत, त्यांच्या मागे उभे राहण्याचे काम सरकार करेल. काही लोक आपत्तीतही राजकारण करत आहेत. सरकार शेतकऱ्या मागे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आराखडा तयार करतोय. भरीव मदतीसाठी केंद्र मदत करेल. तुम्ही काय केले हे आरशात बघा, जनतेने आम्हाला सेवेसाठी पाठवले आहे आम्ही सेवा करू.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजचा दिवस हा सहकार क्षेत्रासाठी ऐतिहासिक आहे. सहकार क्षेत्रातील कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प आज कोपरगावात उभा राहिला असून, हा प्रकल्प विवेक कोल्हे यांच्या पुढाकारातून आणि सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या सहकारी परंपरेतून वास्तवात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हा केवळ अन्नदाता नव्हे, तर ऊर्जादाताही व्हावा हा दूरदर्शी विचार मांडला. त्या विचाराला मूर्त रूप देण्यासाठी सहकार क्षेत्रात नव्या पिढीचे प्रकल्प उभे राहत आहेत. केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांसोबतच्या दीर्घकालीन करारामुळे कारखान्यांना स्थिर निधी मिळू लागला आहे.
वातावरणीय बदलांच्या आव्हानांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोळसा आणि तेलाच्या वापरामुळे होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ऊर्जास्त्रोतांचे परिवर्तन गरजेचे आहे.
We will show factories that are cutting the weight of sugarcane, warns Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Ravindra Dhangekar चंद्रकांतदादा गुन्हेगारांना पाठीशी का घालतात, रवींद्र धंगेकरांचा थेट सवाल
- Uddhav Thackeray : मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केले? आत्मचिंतन करा : एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
- Congress : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी काँग्रेस रस्त्यावर आंदोलन करणार
- Ajit Pawar : अजित पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, तासभर चर्चा झाल्याने राजकीय खळबळ