Janata Vasahat : जनता वसाहतीत ६० वर्षीय आजोबांचा ९ वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न; संतप्त जमावाकडून पर्वती पोलीस ठाण्याला वेढा

विशेष प्रतिनिधी

पुणे: Janata Vasahat पुण्यातील भोर-नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच, आता पुणे शहरात माणुसकीला काळीमा फासणारी समोर आली आहे. पर्वती भागातील जनता वसाहतीत एका ६० वर्षीय नराधमाने आपल्याच ९ वर्षांच्या नातीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, स्थानिक नागरिकांनी हा प्रकार वेळीच पाहिल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून संतप्त नागरिकांनी आरोपीला बदडून पोलिसांच्या हवाली केले आहे.Janata Vasahat

माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जनता वसाहतीमधील एका घरात ६० वर्षीय आरोपीने नऊ वर्षांच्या बालिकेला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांना संशय आल्याने त्यांनी तात्काळ धाव घेतली आणि हा प्रकार उघडकीस आणला. नागरिकांनी या नराधमाला जाब विचारत चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर त्याला पर्वती पोलिसांच्या स्वाधीन केले.Janata Vasahat



घटनेचे वृत्त वणव्यासारखे पसरताच पर्वती पोलीस ठाण्याबाहेर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. नसरापूर घटनेमुळे आधीच जनमानस संतप्त असताना, शहरातील मध्यवस्तीत असा प्रकार घडल्याने लोकांचा संयम सुटला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत नागरिकांनी पोलीस ठाण्याला वेढा घातला. जमावाचा वाढता संताप आणि तणावपूर्ण परिस्थिती पाहता, पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सध्या या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिकृतरीत्या माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकारी संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे.

भोर तालुक्यातील नसरापूर येथे नुकत्याच घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचारामुळे राज्यभर संतापाची लाट आहे. त्या घटनेची जखम ताजी असतानाच पुण्यात घरच्याच व्यक्तीकडून असा प्रयत्न झाल्याने महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पर्वती भागातील वातावरण सध्या अत्यंत संवेदनशील असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

60-Year-Old Grandfather Attempts to Sexually Assault 9-Year-Old Granddaughter in Pune’s Janata Vasahat; Angry Mob Besieges Parvati Police Station

महत्वाच्या बातम्या