पुणे महापालिकेत सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद; स्थायी समिती अध्यक्षांची थेट अतिरिक्त आयुक्तांना धमकी…

विशेष प्रतिनिधी

पुणे: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी सत्ताधारी आणि प्रशासन अधिकाऱ्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली.शहरात नव्याने जाहिरात फलक उभारण्याचा धोरणाला मान्यता देण्यावरून स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले आणि प्राजित नायर यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम देखील संतप्त झाले होते.

महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून शहरातील सार्वजनिक जागा, उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि इतर ठिकाणी जाहिरात फलक उभारण्याचे धोरण तयार केले आहे.या धोरणातून १७०० कोटी रुपयांची उलाढाल होणार असून, जवळपास ४ हजार २४४ जाहिरात फलक उभारले जाणार आहेत.यामुळे २ लाख ७१ हजार चौरस फूट जाहिरात क्षेत्र उपलब्ध होणार असून,संबंधित कंपन्यांकडून महापालिकेला ३० टक्के महसूल मिळणार आहे.



दरम्यान,या प्रस्तावातील आर्थिक पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांनी या व्यवहारातील उत्पन्न निश्चित करताना जीएसटीच्या आधारावर पडताळणी व्हावी, अशी भूमिका स्पष्ट केली होती. अतिरिक्त आयुक्त प्राजित नायर यांच्या मते, कंपन्यांनी भरलेल्या जीएसटी वरून प्रत्यक्ष उलाढाल स्पष्ट होईल आणि महानगरपालिकेचे होणारे नुकसान थांबवता येईल. परत या प्रक्रियेमुळे निर्णयाला विलंब होत असल्याची नाराजी काही पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात होती.

सभागृहात चर्चा सुरू असतानाच स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी तात्काळ स्वाक्षरी करून या धोरणाला मान्यता द्यावी, अशी मागणी केली.मात्र, अतिरिक्त आयुक्त नायर यांनी नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला.संतापलेल्या श्रीनाथ भिमालेंनी “स्थायी समितीच्या बैठकीत बघून घेतो” अशा शब्दात धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे प्रकरणानंतर आयुक्त नवल किशोर राम हे देखील संतप्त झाले आणि काही वेळासाठी ते सभागृहातून बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना श्रीनाथ भिमाले म्हणाले की, ‘ अतिरिक्त आयुक्त किंवा आयुक्तांसोबत कोणताही वाद झालेला नाही. जे काही प्रस्ताव होते, त्यावर चर्चा करण्यासाठी मी त्यांच्याशी बोललो. माझ्या विरोधात चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे’.असे स्पष्ट केले.

वाद अधिक वाढू नये म्हणून सभागृहातील नगरसेवकांकडून मध्यस्थी करण्यात आली. महापौर मंजुषा नागपूर यांनी सभागृह येथे गणेश बिडकर यांना बोलवून घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

Dispute between ruling party and officials in Pune Municipal Corporation; Standing Committee Chairman directly threatens Additional Commissioner…

 

महत्वाच्या बातम्या