विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांमधील विद्युत, पंपिंग आणि स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे उद्या, गुरुवार २३ एप्रिल २०२६ रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही अधिकृत माहिती दिली असून, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे.
पाणीपुरवठा कधीपर्यंत बंद असेल?
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणी कपातीचा हा कालावधी बुधवारी मध्यरात्री १२:०० वाजेपासून ते गुरुवारी मध्यरात्री १२:०० वाजेपर्यंत असा पूर्ण २४ तासांचा असेल. तसेच, दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (२४ एप्रिल २०२६) रोजी सकाळी पाणीपुरवठा नेहमीपेक्षा उशिरा आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.
कोणत्या जलशुद्धीकरण केंद्रांवर काम होणार?
शहरातील प्रमुख जलकेंद्रांमध्ये दुरुस्तीची तातडीची कामे केली जाणार आहेत, ज्यामध्ये खालील केंद्रांचा समावेश आहे.
पर्वती जलशुद्धीकरण केंद्र (जुने आणि नवीन)
वडगाव जलकेंद्र
लष्कर (कॅन्टोन्मेंट) जलकेंद्र
वारजे जलकेंद्र
भामा आसखेड जलकेंद्र
एस.एन.डी.टी. आणि होळकर जलकेंद्र
चतु:शृंगी आणि खडकवासला पंपिंग स्टेशन
कोणकोणत्या भागांना फटका बसणार?
या देखभाल दुरुस्तीमुळे पुण्यातील जवळपास सर्वच भागांवर परिणाम होणार आहे.
मध्यवर्ती भाग- सर्व पेठा (शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारी, नाना, भवानी पेठ इ.), डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, दत्तवाडी आणि पर्वती दर्शन.
दक्षिण पुणे- सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, कात्रज, धनकवडी, आंबेगाव, धायरी आणि भारती विद्यापीठ परिसर.
पूर्व पुणे- पुणे कॅम्प, कोरेगाव पार्क, हडपसर, मुंढवा, खराडी, चंदननगर, रामटेकडी आणि सोलापूर रोड परिसर.
पश्चिम पुणे- कोथरूड, वारजे, कर्वेनगर, पाषाण, बाणेर, बालेवाडी आणि बावधन परिसर.
उत्तर पुणे व नगर रोड- औंध, बोपोडी, खडकी, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी आणि येरवडा परिसर.
नव्याने समाविष्ट गावे- खडकवासला, नांदेड, किरकटवाडी, शिवणे आणि नऱ्हे येथील बूस्टर पंपिंग अंतर्गत येणारे भाग.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना!
पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना खालील आवाहन केले आहे.गुरुवारी होणाऱ्या पाणी कपातीसाठी बुधवारीच आवश्यक पाणी साठवून ठेवावे.
साठवलेले पाणी जपून वापरावे जेणेकरून शुक्रवारी उशिरा पाणी येईपर्यंत अडचण येणार नाही.
भविष्यातील सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी ही देखभाल दुरुस्तीची कामे अत्यंत आवश्यक असल्याने नागरिकांनी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे.
Water supply to entire Pune shut tomorrow
महत्वाच्या बातम्या