पुणे महापालिकेत भाजपच्या दोन महिला नेत्यांमध्ये ‘राडा’; टक्केवारीच्या वादातून दालनात जुंपली!

विशेष प्रतिनिधी

पुणे : विद्यमान सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या दोन महिला नेत्यांमधील अंतर्गत वाद आज पुणे महानगरपालिकेत चव्हाट्यावर आला. बाणेर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या कामावरून माजी नगरसेविका राजश्री काळे आणि नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि गंभीर आरोपांमध्ये झाल्याने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

वादाचे नेमके कारण काय?

बाणेर परिसरात आदिवासी मुलींसाठी एक शासकीय वसतिगृह (Hostel) उभारले जात आहे. या प्रकल्पाच्या कामात हस्तक्षेप करण्यावरून आणि ठेकेदाराच्या निवडीवरून दोन्ही आजी-माजी नगरसेविकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. आज या विषयावरून चर्चा सुरू असताना दोन्ही नेत्यांमधील संयम सुटला आणि भर महापालिकेत शब्दाला शब्द वाढत गेला.



‘टक्केवारी’चा गंभीर आरोप

माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी या वादावर आपली भूमिका मांडताना अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार:

निकृष्ट दर्जाचे काम: रोहिणी चिमटे या एका विशिष्ट ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी आग्रही आहेत, जो निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचा आरोप आहे. हा सर्व वाद केवळकमिशनच्या (टक्केवारी) देवाणघेवाणीतून झाला असल्याचे काळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.त्या म्हणाल्या की नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी कंत्राटदाराला टक्केवारी मिळेपर्यंत काम सुरू करू नका, अशी धमकी दिली. स्थायी समिती सदस्य असल्याचा धाक दाखवत काम रोखण्याचा प्रयत्न केला.” असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, नगरसेविका रोहिणी चिमटे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. केंद्राच्या सीमाभिंतीचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे शेजारील नागरिकांना त्रास होत आहे. ते काम आधी पूर्ण करण्यास सांगितले होते त्यावरून गैरसमज झाला असे त्यांनी सांगितले.

राजश्री काळे यांच्या म्हणण्यानुसार आदिवासी मुलींच्या हक्काच्या कामात केवळ आर्थिक फायद्यासाठी अडथळे आणले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

राजकीय पडसाद:

या घटनेमुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजीचे दर्शन घडले आहे. एकाच पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी झालेल्या वादामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

या प्रकरणाची दखल आता भाजपचे वरिष्ठ नेते घेणार का? आणि महापालिका प्रशासन या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करणार का? याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Clash Between Two Female BJP Leaders in Pune Municipal Corporation; Dispute Erupts Over ‘Commission’

महत्वाच्या बातम्या