विशेष प्रतिनिधी
पुणे: विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपा नेत्यांची बैकठक पार पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. भाजपाच्या वाट्याला आलेल्या सहा जागांसाठी ३० उमेदवारांच्या नावाची यादी करण्यात आली आहे.निश्चित करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी दिल्लीत पाठवण्यात आली आहे.दिल्लीतील नेत्यांनी निर्णयन घेतल्यानंतर अंतिम निर्णय दिल्लीत घेतला जाणार आहे.
यादीत या नावांचा समावेश..
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत पाठवण्यात आलेल्या यादीत प्रशांत परिचारक, राम सातपुते,सुरेश हळवणकर, निलय नाईक, प्रकाश पाटील देवसरकर, राजीव पोतदार, संजय केणेकर, सुनील कर्जतकर, प्रज्ञा सातव, राज राऊत, विजय चौधरी, लक्षण सावजी, सुरेश बनकर, अर्चना पाटील चाकूरकर, दयाशंकर तिवारी, अनंतराव देशमुख, गणेश हाके, नीता केळकर, राजेश पांडे, डॉ.आरती फुसाटे, अतुल काळसेकर, माधव भंडारी, माधवी नाईक या नावांचा समावेश आहे.
संघटनेत काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी..
प्रज्ञा सातव यांचे नाव भाजपाकडून उमेदवारीसाठी निश्चित मानले जात आहे.महाराष्ट्रातील नेत्यांकडून तीन नावांसाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे.तर,संघटनेमध्ये सक्रिय काम करणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार असल्याची चर्चा सध्या आहे.पुढच्या काही काळात महाराष्ट्रात मोठ्या निवडणुका नसल्याने राजकीय आणि सामाजिक समीकरणांचा विचार न करता संघटनेसाठी काम करणाऱ्या चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी भाजपा मधील नेत्यांनी केली असल्याचे समजत आहे.
महाविकासआघाडीकडून संभ्रम कायम..
विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येत आहे.ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत.मात्र,उद्धव ठाकरे हे स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक नाहीत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली आहे.मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारी बाबत संभ्रम आहे.