CM Devendra Fadnavis : वाद निर्माण करून मते मिळत नाहीत, पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांकडून मनसेची कानउघाडणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Devendra Fadnavis कोणत्याही राजकीय फायद्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणे चुकीचे आहे. प्रत्येक विषयाला वादाचे स्वरूप देऊन राजकारण केल्याने कधीच मते मिळत नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेची कानउघाडणी केली आहे.CM Devendra Fadnavis

जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या सोयीसाठी मुंबईतील काही रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली आहे. वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या पाहणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणत्याही समाजाची परंपरा असेल तर तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे. त्याचवेळी ज्या समाजाची ती परंपरा आहे, त्यांनीही इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. परस्पर आदर आणि सहअस्तित्व हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख आहे.CM Devendra Fadnavis



मनसेच्या आक्रमक भूमिकेचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काही जण केवळ चर्चेत राहण्यासाठी विविध मुद्द्यांवर वाद निर्माण करतात. प्रत्येक विषयाला राजकीय रंग देणे आणि त्यातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. अशा प्रत्येक कृतीवर प्रतिक्रिया देणे आवश्यक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जैन धर्मगुरू आणि साध्वी परंपरेनुसार अनवाणी पायांनी प्रवास करतात. उन्हाळ्यात तापलेल्या डांबरी रस्त्यांवरून चालताना त्यांना त्रास होऊ नये, यासाठी घाटकोपर, दादर आणि दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये रस्त्यांवर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्याचे जैन समाजातील सदस्यांचे म्हणणे आहे. घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीजवळ अशा पट्ट्यांचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर या मुद्द्यावर वाद निर्माण झाला.

दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या पट्ट्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत महापालिकेला त्या हटवण्यास भाग पाडले होते. त्यानंतर हा वाद गिरगावपर्यंत पोहोचला. गिरगावमधील मनसे विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी रस्त्यावरील पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग फासून निषेध व्यक्त केला.

आंदोलनाची माहिती मिळताच गावदेवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनसे तसेच ‘आम्ही गिरगावकर’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, दादर, गिरगाव आणि घाटकोपर परिसरात या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवस हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“Creating Controversies Doesn’t Win Votes”: CM Devendra Fadnavis Rebukes MNS Over White Stripes Row

महत्वाच्या बातम्या