KEM Medical : केईएम विद्यार्थिनी डॉक्टरवर अश्लील विनोद प्रकरणी कारवाई; १५ दिवसांची सक्तीची रजा, चौकशी समिती नियुक्त

विशेष प्रतिनिधी

मुंबई : KEM Medical स्टँडअप कॉमेडी शोमध्ये देहदान केलेल्या मृतदेहाच्या खासगी अंगाबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील विनोद केल्याप्रकरणी केईएम रुग्णालयातील विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. केईएम प्रशासनाने तिला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले असून या कालावधीत महाविद्यालय, रुग्णालय आणि वसतिगृह परिसरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमण्यात आली असून समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.KEM Medical

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध व्यक्तींच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने ३७० रुपयांच्या बिर्याणीचा उल्लेख करत एका तरुणीसोबतच्या वर्तनाबाबत केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संबंधित कंपनीने त्या तरुणाची नोकरीही समाप्त केली. त्याच पार्श्वभूमीवर आता डॉ. सेजल पवार हिचा दोन महिन्यांपूर्वीच्या स्टँडअप शोमधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.KEM Medical



माहितीनुसार, डॉ. सेजल पवारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका स्टँडअप कॉमेडी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि टाळ्यांचा कडकडाट पाहून ती उत्साहाच्या भरात वाहवत गेली. याच वेळी तिने वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित अनुभव सांगताना देहदान केलेल्या मृतदेहाबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी केली. कार्यक्रमाच्या वेळी या वक्तव्यावर काही प्रेक्षकांनी हशा व्यक्त केला असला तरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला.

वैद्यकीय व्यवसाय हा संवेदनशील आणि समाजविश्वासावर आधारित असल्याने अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांच्या व्यावसायिक नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त करण्यात आली. विशेषतः देहदान करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावनांचा अनादर झाल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला.

वाद वाढल्यानंतर केईएम प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. प्राथमिक चौकशीअंती डॉ. सेजल पवारला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. या काळात तिला रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय तसेच वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

समिती संबंधित व्हिडिओ, कार्यक्रमातील परिस्थिती, विद्यार्थिनीचे स्पष्टीकरण आणि इतर बाबींची तपासणी करून सात दिवसांत अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर पुढील शिस्तभंगात्मक कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉ. सेजल पवारने आपली भूमिका स्पष्ट करताना कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे म्हटले आहे. स्टेजवरील वातावरण आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आपण वाहवत गेलो, तसेच दोन महिन्यांनंतर हा व्हिडिओ इतका मोठा वाद निर्माण करेल याची कल्पना नव्हती, असे तिने सांगितले.

ज्या कार्यक्रमात हा वादग्रस्त विनोद करण्यात आला होता, त्या कार्यक्रमाशी संबंधित कॉमेडियन प्रणीत मोरे यानेही सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त केली आहे. कार्यक्रमादरम्यान झालेल्या वक्तव्यांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल माफी मागत असल्याचे त्याने म्हटले आहे.

KEM Medical Student Suspended for 15 Days Over Obscene Joke Row; Inquiry Committee Formed

महत्वाच्या बातम्या