गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी भाजपमध्ये प्रवेश करणार? औंधमध्ये राजकीय हालचालींना वेग

विशेष प्रतिनिधी

औंध : औंध आणि परिसरातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला आहे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या बैठकीत विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा, असा जोरदार आग्रह व्यक्त करण्यात आला. Gayatridevi Pantpratinidhi

औंध व परिसरात यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकासकामांना चालना मिळाली होती. काही प्रकल्प पूर्ण झाले असले तरी, अनेक महत्त्वाच्या योजना अद्याप प्रलंबित आहेत. यामुळे विकासासाठी सत्ताधारी पक्षात जाणे गरजेचे असल्याचा सूर बैठकीत उमटला.



औंध शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ विश्वस्त हणमंतराव शिंदे यांनीही या बैठकीत स्पष्ट मत मांडत, “रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राजकीय बदल अपरिहार्य आहे,” असे सांगितले. विशेषतः औंधसह २१ गावांच्या शेतीसाठी पाण्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बैठकीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी गायत्रीदेवी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सत्ताधारी यंत्रणेशी थेट समन्वय साधावा, अशी भूमिका मांडली. मात्र, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या असून, योग्य वेळी विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

“औंध परिसरातील विकासकामांबाबत मी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेणार आहे. त्याशिवाय इतर कोणताही राजकीय निर्णय सध्या घेतलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, औंध परिसरात या संभाव्य राजकीय बदलामुळे उत्सुकता वाढली असून, गायत्रीदेवी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Gayatridevi Pantpratinidhi to join BJP? Political activity gains pace in Aundh

महत्वाच्या बातम्या