मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव

विशेष प्रतिनिधी

बीड : मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा स्वरूपानंद देशमुख यांनी पराभव केला आहे. अश्विनी देशमुखांना अवघ्या ९२ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. स्वरूपानंद देशमुख हे मस्साजोगचे सरपंच झाले असून त्यांना १८ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या झाल्याने या रिक्त पदासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख तसेच स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत झाली. अश्विनी देशमुख यांच्यासाठी त्यांची मुलगी वैभवी आणि मुलगा विराज यांनीही घरभेटी देत प्रचार केला.



अश्विनी देशमुख यांनी दिवंगत संतोष देशमुख यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले होते. तर स्वरुपानंद देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात गावासाठी केलेल्या कामांच्या जोरावर गावकऱ्यांकडे मतांचे दान मागितले होते.
मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत २०८४ पैकी १७४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानावेळी मतदान केंद्रबाहेर दोन्ही गट समोरा-समोर देखील आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी वेळी हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली होती.

खरेतर ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. हे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर झालेल्या लढतीत मस्साजोगकरांनी स्वरूपानंद देशमुख यांच्या बाजूने कौल दिला आहे. अश्विनी देशमुख पराभूत झाल्या असून स्वरूपानंद देशमुख ९२ मतांनी विजयी झाले आहेत. मागील निवडणुकीत अवघ्या ९ मतांनी स्वरूपानंद देशमुख पराभूत झाले होते. पोटनिवडणूक झाली असल्याने स्वरूपानंद देशमुखांना सरपंचपदासाठी १८ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.

Late Santosh Deshmukh’s Wife Defeated in Masajog Sarpanch By-Election

महत्वाच्या बातम्या