नाशिक विधान परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, भाजपचे बंडखोर गोकुळ गीते विजयी

विशेष प्रतिनिधी

नाशिक : राज्यभराचे लक्ष लागलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपमधून बंडखोरी करून निवडणूक रिंगणात उतरलेल्या गीते यांनी पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करत विजय जवळपास निश्चित केला.

मतमोजणीला सकाळी सुरुवात होताच गोकुळ गीते यांनी आघाडी घेतली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच त्यांनी विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पार केल्याने पुढील फेऱ्यांची आवश्यकता भासली नाही. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पहिल्याच फेरीत स्पष्ट झाला.



निवडणुकीपूर्वी गोकुळ गीते माघार घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम ठेवत महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केले. अखेर मतदारांनीही त्यांच्याच बाजूने कौल दिल्याने महायुतीच्या गणितांना मोठा धक्का बसला आहे.

मतमोजणी केंद्राबाहेर गीते समर्थकांनी जल्लोष सुरू केला असून फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत विजय साजरा केला जात आहे. दुसरीकडे पराभव स्पष्ट होताच नरेंद्र दराडे यांनी मतमोजणी केंद्रातून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या निकालामुळे नाशिकच्या राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका महत्वाची ठरली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी गीते यांना मदत केल्याची चर्चाही रंगली आहे.

Nashik MLC poll shocker: BJP rebel Gokul Gite defeats Shinde Sena candidate

महत्वाच्या बातम्या