विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये महायुतीने दमदार कामगिरी करत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण १७ जागांपैकी ६ जागांवर महायुतीचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ११ जागांच्या निकालांमध्येही महायुतीने एकतर्फी विजय मिळवत बहुतेक मतदारसंघांवर आपला झेंडा फडकावला. नाशिकमध्ये भाजपचे बंडखाेर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत मोठा राजकीय धक्का दिला.Mahayuti
नागपूरमध्ये भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे अतुल लोंढे यांचा तब्बल ५५२ मतांच्या फरकाने पराभव केला. पोतदार यांना ६८२ मते मिळाली, तर लोंढे यांना केवळ १३० मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसच्या संख्याबळापेक्षा कमी मते मिळाल्याने महाविकास आघाडीतील मतफुटीची चर्चा रंगली.
धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे महेश देशमुख यांचा ७२१ मतांच्या विक्रमी फरकाने पराभव केला. बसवराज पाटील यांना ८४५ मते मिळाली, तर देशमुख यांना केवळ १२४ मते मिळाली. हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याचा विजय आहे.
सांगली-सातारा मतदारसंघात भाजपचे धैर्यशील कदम यांनी महाविकास आघाडीचे अभयसिंह जगताप यांचा ३०१ मतांनी पराभव केला. कदम यांना ५९३ मते मिळाली, तर जगताप यांना २९२ मते मिळाली.
जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन यांनी महाविकास आघाडीचे शरद तायडे यांचा दारुण पराभव केला. महाजन यांना ५७७ मते मिळाली, तर तायडे यांना अवघी ५ मते मिळाल्याने हा निकाल विशेष चर्चेत राहिला.
छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात भाजपचे सुहास शिरसाठ यांनी ४५५ मते मिळवत विजय मिळवला. ठाकरे गटाचे गणेश लोखंडे यांना १३५ मते, तर एमआयएम समर्थित अपक्ष इसाक खान यांना ३५ मते मिळाली.
सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंतराव देशमुख यांचा ३६५ मतांनी पराभव केला. राऊत यांना ४८३ तर देशमुख यांना ११८ मते मिळाली.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेस समर्थित अपक्ष नरेश ईश्वरकर यांचा १४८ मतांनी पराभव करत विजय मिळवला. ब्राह्मणकर यांना ३०४ मते मिळाली.
परभणी-हिंगोलीत शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी पहिल्या पसंतीच्या २४२ मतांसह विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे विवेक नवंदर यांचा पराभव केला.
अमरावतीमध्ये भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी ३९० मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळाले नाही, तर वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली.
सर्वाधिक चर्चेचा निकाल नाशिकमध्ये लागला. भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या गोकुळ गीते यांनी ३५७ मते मिळवत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. दराडे यांना २४८ मते मिळाली. या निकालामुळे महायुतीला मोठा राजकीय धक्का बसला असून नाशिकमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, पुण्यात विक्रम काकडे, अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरे, ठाण्यात रवींद्र फाटक, कोकणात अनिकेत तटकरे, यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी आणि वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमध्ये अरुण लखाणी हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.
महायुतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपली पकड कायम असल्याचे दाखवून दिले आहे. अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीची मते फुटल्याचे चित्र समोर आले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी हा निकाल राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
Mahayuti sweeps Legislative Council polls; wins 16 of 17 seats, BJP rebel triumphs in Nashik
महत्वाच्या बातम्या