विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेता व दिग्दर्शक रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील अडथळे दूर झाले असून मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भातील जनहित याचिका फेटाळून लावत निर्मात्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे १ मे रोजी नियोजितप्रमाणे चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Raja Shivaji
चित्रपटाच्या नावातून ‘छत्रपती’ हा शब्द वगळल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याचा दावा करत ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन’ या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती.मुख्य न्यायमूर्ती
श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद फेटाळले. न्यायालयाने स्पष्ट केले की, चित्रपटाचे शीर्षक कोणत्याही प्रकारे शिवाजी महाराजांच्या गौरवाला धक्का देणारे नाही. केवळ अपूर्ण किंवा इंटरनेटवरील माहितीच्या आधारे अशा प्रकारची याचिका दाखल करणे चुकीचे असल्याचेही न्यायालयाने सुनावले.
निर्मात्यांच्या वतीने मांडण्यात आलेल्या बाजूवर न्यायालयाने समाधान व्यक्त केले. चित्रपट हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वीच्या, म्हणजे १६७४ पूर्वीच्या कालखंडावर आधारित आहे. त्या काळात त्यांना ‘राजा शिवाजी’ म्हणून संबोधले जात होते, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच चित्रपटाच्या सुरुवातीला यासंदर्भात स्पष्ट ‘डिस्क्लेमर’ देण्यात आला असून केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) त्यास मान्यता दिली आहे, असेही सांगण्यात आले.
हा चित्रपट रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला असून निर्मिती ज्योती देशपांडे यांनी केली आहे. २०२४ मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानंतरपासूनच या चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीत समाधान व्यक्त करण्यात येत असून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपटांच्या सर्जनशील मांडणीला न्यायालयाने दिलेला आधार महत्त्वाचा मानला जात आहे.
‘Raja Shivaji’ film cleared for release; big relief for Riteish Deshmukh
महत्वाच्या बातम्या
- मराठी अनिवार्यतेवर सरकार ठाम; चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतीची शक्यता..
- प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची पोलिसांत तक्रार
- शिवसेनेत गोऱ्हे – कडूंचा नावाला विरोध? एकनाथ शिंदेच्या पुढचा पेच वाढला…
- धर्माच्या भावनेने बघू नका, मराठी आलीच पाहिजे : इम्तियाज जलील यांचे मुस्लिम समाजाला आवाहन