Nida Khan : टीसीएस धर्मांतर प्रकरणात निदा खानला पोलिस कोठडी; मलेशिया कनेक्शन, ‘हनिया’ नावाचे दस्तऐवज तपासात

विशेष प्रतिनिधी

नाशिक: Nida Khan  नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने तिला ११ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तिच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत असून धर्मांतर, सोशल मीडिया ब्रेनवॉशिंग, मालेगाव कनेक्शन आणि मलेशिया जॉब लिंक यांसारख्या गंभीर बाबी तपासात पुढे आल्या आहेत.Nida Khan

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने २ मे रोजी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार झाली होती. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास नारेगाव परिसरातून तिला ताब्यात घेतले.Nida Khan

महिला आरोपी असल्याने सूर्यास्तानंतर अटकेसंबंधी सर्व कायदेशीर नियमांचे पालन करत तिला प्रथम स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर नाशिकमध्ये आणण्यात आले.Nida Khan



 

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून त्याचे अनेक पैलू आहेत. पीडितेला धर्मांतरासाठी भीती आणि दबाव टाकण्यात आल्याचा संशय आहे. तपासात पीडितेला बुरखा देण्यात आल्याचे तसेच नमाज आणि हिजाबबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याचे समोर आले आहे.

तपास यंत्रणांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीची नेमकी भूमिका काय होती, तिच्यासोबत आणखी कोण सहभागी होते आणि संपूर्ण रॅकेट कसे कार्यरत होते याचा सखोल तपास आवश्यक आहे.

तपासादरम्यान पीडितेच्या मोबाईलमध्ये काही इंस्टाग्राम आणि युट्यूब लिंक तसेच चिथावणीखोर रील्स आढळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या माध्यमातून मानसिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाला का, याची चौकशी सुरू आहे.

तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून पीडितेचे नाव बदलून “हनिया” ठेवण्यात आल्याचे काही दस्तऐवज पोलिसांना मिळाले आहेत. मालेगावमधील काही व्यक्ती नामांतर आणि धर्मांतर प्रक्रियेत सक्रिय असल्याचा संशयही तपासात व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, पीडित महिलेला मलेशियात नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. इमरान नावाच्या व्यक्तीमार्फत तिला पुढे पाठवण्याचा प्लॅन होता का, याची चौकशी सुरू आहे.

या व्यवहारामागे आर्थिक देवाणघेवाण किंवा ‘मनी ट्रेल’ आहे का, याचाही तपास केला जात आहे. यामध्ये मालेगावमधील काही व्यक्तींची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

तपासात आता माजिद पटेल नावाच्या व्यक्तीचे नाव नव्याने समोर आले आहे. आरोपी निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरात राहत होती. तिला आश्रय कोणी दिला, याचा तपास सुरू असून माजिद पटेलला देखील आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्यावर अतिरिक्त कलमेही लावली आहेत.

दरम्यान, आरोपी निदा खान गर्भवती असल्याने तिने न्यायालयाकडे आईला भेटण्याची परवानगी मागितली होती. सरकारी पक्षाने यास हरकत घेतली नाही. न्यायालयाने आरोपीला दिवसातून दोन वेळा आईला भेटण्याची तसेच आवश्यक औषधे उपलब्ध करून देण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

Nida Khan sent to police custody in TCS conversion case; Malaysia link, ‘Haniya’ documents under probe

महत्वाच्या बातम्या