अशोक खरात प्रकरणात चार मंत्र्यांवर गंभीर आरोप, नाना पटोलेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्वयंघोषित दैवी शक्तीधारक अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर आणि मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. Nana Patole

खरात प्रकरणात राज्य मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा समावेश असल्याचा दावा करत त्यांनी या सर्व मंत्र्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसेच या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “अशोक खरातकडून अनेक संवेदनशील माहिती गोळा करण्यात आली आणि त्यानंतर त्याला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो. या प्रकरणाबाबत मी विधानसभेतही आवाज उठवला होता. आता यामध्ये मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांची नावे समोर येत असल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.”



पटोले यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही जोरदार टीका केली. “महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राजकीय गुंड, भोंदू बाबा आणि फसवणूक करणारे लोक बिनधास्तपणे वावरत आहेत. राज्यात कायद्याची भीती उरलेली नाही. म्हणूनच अशा घटना सातत्याने घडत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. राज्य सरकार गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरत असल्याने समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून अनेक महिलांना मानसिक व आर्थिक जाळ्यात ओढल्याचा आरोप खरातवर आहे. महिलांचे लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. काही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि अनेक पीडित महिला तसेच फसवणूक झाल्याचा दावा करणारे व्यावसायिक तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागले.

या प्रकरणात अनेक प्रभावशाली व्यक्तींशी खरातचे संबंध असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. विशेष म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नावही या वादात ओढले गेल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. वाढत्या दबावानंतर रूपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यानंतर हे प्रकरण आणखीच चर्चेत आले आहे.

विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Nana Patole demands ouster of four ministers over serious allegations in Ashok Kharat

महत्वाच्या बातम्या