१०५ दिवसांत मराठी शिका, अन्यथा १६ ऑगस्टपासून कारवाई; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ मागितल्यानंतर महाराष्ट्र सरकारने त्यांना तब्बल १०५ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र या कालावधीत किमान व्यावहारिक मराठी आत्मसात न केल्यास १६ ऑगस्टपासून संबंधित चालकांवर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.

मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित हिंदी भाषिकांच्या लोकमत नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या वर्धापन दिन आणि ‘शॉर्ट्स जल्लोष मेळावा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे आवश्यक असल्याचे सांगितले.

“मराठी शिकणे म्हणजे कोणावर बंधन घालणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर करणे आहे. प्रवाशाला वाहनात बसल्यानंतर आपल्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे. ‘नमस्कार’, ‘कुठे जायचे?’ आणि ‘किती भाडे होईल?’ एवढे तरी प्रत्येक चालकाला मराठीत बोलता आले पाहिजे,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी हिंदी भाषिक चालकांना स्वयंस्फूर्तीने मराठी शिकवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या हाजी अराफत शेख यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. चालक स्वतःहून मराठी शिकण्यास पुढे येत असतील, तर शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

परिवहन मंत्री म्हणाले की, व्यावसायिक वाहन चालक हा केवळ चालक नसून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा महत्त्वाचा घटक आहे. वाहतूक व्यवस्था थेट समाजाशी जोडलेली असल्यामुळे चालकांचे वर्तन, भाषा आणि संवाद यावर संपूर्ण व्यवस्थेची प्रतिमा अवलंबून असते.



तसेच महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची भूमी असल्याचे सांगत त्यांनी परराज्यातून आलेल्या चालकांनी स्थानिक भाषा आत्मसात केल्यास प्रवासी, पोलिस, प्रशासन आणि नागरिकांशी संवाद अधिक सुलभ होईल, असे नमूद केले. त्यामुळे गैरसमज कमी होतील आणि सेवा अधिक सुसंस्कृत बनेल, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारकडून चालकांसाठी विविध कल्याणकारी योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम राबवले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. “मराठीला विरोध म्हणून पाहू नका, ती आपुलकीची भाषा म्हणून स्वीकारा,” असे आवाहन करत “मी मराठी, तू मराठी, आमचा स्वाभिमान मराठी” ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे, असे सरनाईक म्हणाले.

Maharashtra gives auto, taxi drivers 105 days to learn Marathi; action from August 16 if they fail, warns minister Pratap sardesai

महत्वाच्या बातम्या