‘पंचवटी’वरून गदिमा कुटुंबात वाद; पुनर्विकासाच्या हालचालींना सौमित्र माडगूळकर यांचा तीव्र विरोध

विशेष प्रतिनिधी

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर उर्फ गदिमा यांच्या स्मृतींशी जोडलेल्या ऐतिहासिक ‘पंचवटी’ निवासस्थानावरून आता माडगूळकरकुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. सौमित्र श्रीधर माडगूळकरयांनी काही कुटुंबीयांकडून ‘पंचवटी’चा पुनर्विकास किंवा पाडकाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

सार्वजनिक निवेदन जारी करत सौमित्र माडगूळकरयांनी सांगितले की, “पंचवटी” ही केवळ खासगी मालमत्ता नसून मराठी साहित्य आणि संस्कृतीचा एक ऐतिहासिक वारसा आहे. गदिमा यांच्या अनेक महत्त्वाच्या साहित्यकृती, तसेच ‘गीत रामायण’शी संबंधित लेखन याच वास्तूमध्ये घडले आहे. आम्ही गेल्या दहा वर्षांपासून गदिमा स्मारक उभारण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असून स्मारकाच्या इमारतीचे काम आता पूर्णत्वास आले आहे. मात्र, त्याचबरोबर मूळ ‘पंचवटी’ वास्तू जतन करणेही तितकेच आवश्यक आहे.
ही वास्तू म्हणजे गदिमांच्या स्मृतींचे मंदिर आहे. तिचे जतन झाले पाहिजे, असे सांगत सौमित्र माडगूळकरयांनी आरोप केला की, काही नातेवाईक आर्थिक फायद्यासाठी पुनर्विकासाच्या बाजूने भूमिका घेत आहेत. मात्र, आपण या निर्णयाला ठाम विरोध करत असल्यामुळे आपल्यावर आणि आपल्या पत्नीवर सोशल मीडियाद्वारे खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. “पंचवटी” विकणे किंवा पुनर्विकासासाठी देणे म्हणजे मराठी साहित्याच्या एका ऐतिहासिक स्मृतीस्थळाचा अंत करण्यासारखे आहे.



या वादामुळे आता साहित्यविश्वातही चर्चा रंगू लागली असून गदिमा प्रेमी, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक जण ‘पंचवटी’ जतन करण्याच्या बाजूने मत व्यक्त करत आहेत.
दरम्यान, सौमित्र माडगूळकरयांनी मराठी साहित्यप्रेमी आणि गदिमांचे चाहते यांनी या वारसा वास्तूच्या संरक्षणासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.

GaDiMa family feud erupts over ‘Panchavati’; Soumitra Madgulkar opposes redevelopment move

महत्वाच्या बातम्या