पैसे घेतल्याचा आरोप राऊत कसे करू शकतात, संजय शिरसाट यांनी फटकारले

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर : राज्यातील विधान परिषद निवडणुकांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण चांगलेच तापले आहे. माघार घेतलेल्या उमेदवारांनी पैसे घेतल्याचा आराेप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरून मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊत यांना चांगलेच फटकारले आहे.

संजय राऊत काँग्रेस-राष्ट्रवादीने सहकार्य केले नाही सांगत आहेत, संख्याबळ नसल्याने पराभव होणार हे सांगत आहेत. तरीही उमेदवारांनी माघार घेतली तर त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप राऊत कसे करू शकतात, असा सवाल शिरसाट यांनी केला आहे. ते म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नाही त्यामुळे निवडणूक लढवण्यात काही अर्थ नाही हे उबाठाला काही उमेदवारांनी सांगितले पण त्यांनी ऐकलेउ नाही म्हणून उमेदवारांनी माघार घेतली, त्यानंतर उबाठाकडून त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत, यात काही तथ्य नाही हे जनतेला माहिती आहे.



संजय शिरसाट म्हणाले की, नाशिकमध्ये प्रसाद हिरे हे आमच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. आज उदय सामंत आणि गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आहेत ते चर्चा करतील. मला वाटते की महायुतीमधील कोणीही बंडखोरी करणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चिंता करण्याची गरज नाही. सर्व 17 पैकी 17 जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होणार आहेत.

संजय शिरसाट म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत कोणी माघार घेतली म्हणून त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करायचा हे काही बरोबर नाही. निवडणूक लढवतांना कार्यकर्त्याना साथ द्यायची नाही, पण माघार घेतली तर त्याच्यावर आरोप करायचे हे चुकीचे आहे. आता कार्यकर्ता हुशार झाला आहे, तो घराची राख रांगोळी करत निवडणूक लढवणार नाही. तुम्ही त्याला पाठबळ सुद्धा दिले पाहिजे. विधान परिषद निवडणुकीत मविआची ताकद काय आहे हे सर्वांना माहिती आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, महायुती किती भक्कम आहे हे सर्वांना या विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसून येईल. 25 कोटी रुपये कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी खर्च करण्यात आल्याचा आरोप राऊतांकडून करण्यात आला यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, 25 कोटी रुपये हा काय पॉकिट मनी आहे का? जर तुम्हाला हे सर्व माहिती आहे तर तुम्ही तिथे काय करत होतात? ही माहिती तुम्हाला कोणाला देता आली नाही का? तिथे काय वॉचमनगिरी करत होतात का?

How can Raut make allegations of accepting money? — Sanjay Shirsat

महत्वाच्या बातम्या