विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune पुणे शहराच्या उपनगरात सुरू असलेल्या बेकायदा रेव्ह पार्ट्यांविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यावर पहाटे धाड टाकली. या कारवाईत तब्बल १०७ तरुण आणि ४९ तरुणी, अशा एकूण १५६ जणांना ताब्यात घेण्यात आले. या पार्टीमध्ये अमली पदार्थ आणि बंदी असलेल्या हुक्क्याचे सेवन होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.Pune
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, तुळापूर येथील एका आलिशान बंगल्यात ‘प्रोजेक्ट एक्स’ या नावाने रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी ब्लेज एंटरटेनमेंटचे ऐमन शेख आणि स्टार लाईट एंटरटेनमेंटचे यश चौधरी यांनी आयोजित केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पहाटे सुमारे अडीच वाजता या ठिकाणी छापा टाकला.Pune
या कारवाईसाठी गुन्हे शाखेचे १५ अधिकारी आणि ६५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलिसांनी बंगल्याची झडती घेतली असता ३ ग्रॅम गांजा तसेच बंदी असलेल्या हुक्का फ्लेवर्सचे तीन कप पॉट्स जप्त करण्यात आले. पार्टीत उपस्थित असलेल्या अनेकांकडून हुक्क्याचे सेवन करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.
तपासादरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला. पोलिसांनी ९ लाख २२ हजार रुपयांचे मद्य जप्त केले. विशेष म्हणजे, आयोजकांना मद्य वाटपाची परवानगी केवळ रात्री साडेअकरा वाजेपर्यंत देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही पार्टी सुरू असल्याचे आणि मद्यसेवन सुरूच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
धक्कादायक बाब म्हणजे, या पार्टीत उपस्थित असलेल्या तिघांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे मद्यविक्री व सेवनासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे आयोजकांच्या निष्काळजीपणावर आणि प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पहाटे सुरू झालेली ही कारवाई सकाळपर्यंत सुरू होती. पोलिसांनी मद्यसाठा, ध्वनीप्रणाली, हुक्का साहित्य आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आयोजक, बंगल्याचा मालक आणि संबंधित व्यवस्थापकांची चौकशी सुरू असून पार्टीसाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, लोणीकंद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अमली पदार्थ, मद्य नियमांचे उल्लंघन आणि इतर कायदेशीर बाबींअंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Massive rave party busted near Pune; 156 attendees detained
महत्वाच्या बातम्या