विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशलकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर आज 20 अंतिम निकाल लागला आहे. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबासाठी मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. Pawanraje Nimbalkar murder case
सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्र. 55 मध्ये ही ऐतिहासिक सुनावणी पार पडली. बिहारच्या तुरुंगात असलेला मुख्य शूटर पिंटू सिंग याला पोलिसांनी उशिरा हजर केल्यामुळे काही काळ सस्पेन्स वाढला होता. तो न्यायालयात हजर होण्याआधीच कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयाने निकालवाचनाला सुरुवात केली.
न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी निकालपत्राचे वाचन करताना तपास यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावर आणि पोलिसांच्या चुकांवर अत्यंत गंभीर बोट ठेवले. न्यायाधीशांचे सविस्तर निकालवाचन खालीलप्रमाणे होते. 20 वर्षांनंतर मी हा निकाल देतोय, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे की एका लोकनेत्याची अशा प्रकारे कळंबोली येथे गोळीबार करून हत्या होते. सुरुवातीला कळंबोली पोलीस, नंतर नवी मुंबई गुन्हे शाखा आणि अखेर सीबीआयकडे हा तपास गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने खटला या कोर्टात आला. या प्रकरणात 127 साक्षीदार तपासले गेले. न्यायालय केवळ कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निकाल देत आहे.
न्यायालयाने म्हटले की, हा खटला पूर्णपणे माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीवर उभा आहे. जैनच्या म्हणण्यानुसार गुन्हे शाखेने त्याला 8 सप्टेंबर 2009 रोजी मुंब्रा येथून ताब्यात घेतले, मात्र त्याला अधिकृत अटक 25 सप्टेंबर दाखवली. या दरम्यान त्याला 15 दिवस बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण करण्यात आली, औषधे बंद केली आणि कबुलीजबाब घेतला. हा पहिला जबाब कायद्याला धरून नव्हता आणि सरकारी पक्षाने ही माहिती न्यायालयाला न सांगून मोठी घोडचूक केली, ज्यामुळे हा पुरावा संशयाच्या खाईत ढकलला गेला. दोन्ही जबाबात मोठी तफावत आहे.
माफीच्या साक्षीदाराने पैशांमुळे हा गुन्हा केल्याचा दावा केला होता, जो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायमूर्ती म्हणाले, साक्षीदाराचे मुंबई, नवी मुंबई, मिरा-भाईंदर येथे अनेक घरे आणि मिठाईची दुकाने आहेत. त्याच्याकडे साडेचार किलो सोन्याचे भांडवल आहे. त्याचा कुठलाही उद्योग डबघाईला आलेला नव्हता. अशा परिस्थितीत त्याला केवळ 50 हजार रुपयांची गरज होती म्हणून त्याने एवढी मोठी हत्या केली, हे अजिबात पटणारे नाही. त्याला सोयीनुसार खोटं बोलण्याची सवय आहे.
तपासातील सर्वात मोठ्या त्रुटीवर बोट ठेवताना न्यायालय म्हणाले, या खटल्याचा तपास करताना कुठल्याही आरोपीचा मोबाईल फोन जप्त केलेला नाही. त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढले गेले नाहीत. जप्ती पंचनाम्यात आरोपींच्या खिशात काय सापडले याची नोंद नाही. जर सीडीआर काढले असते, तर आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते का, हे स्पष्ट झाले असते. घटनाक्रमात 12 कॉल रेकॉर्डचा उल्लेख आहे, ज्यातील एक फोन पीसीओ वरून झाला होता. पवनराजेंना आरोपींचा थेट फोन आलाच नाही, तर मग पाठलागाची आणि संवादाची ही कथा ग्राह्य कशी धरायची?
न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, माफीच्या साक्षीदाराने हत्येच्या दिवशी तो मुंबईबाहेर कसा गेला, याच्या वेळोवेळी चार वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. बोरिवलीहून गाडी पकडून थेट श्रीनाथजी मार्गे पडेसरीला गावी गेलो. आधी अहमदाबादला गेलो, मग श्रीनाथजीवरून गावी गेलो. बोरिवलीहून अहमदाबादला मित्राकडे मांडववाड्याला गेलो. बोरिवलीहून नाथद्वारा, तिथून कोठारावर शाळेत राहिलो, मग मांडववाड्यात मित्राकडे आणि तिथून अहमदाबादच्या भाग्यदोय हॉटेलमध्ये राहिलो, अशा चार गोष्टी त्याने सांगितल्या. न्यायाधीश म्हणाले, प्रत्येक वेळी नवीन स्टोरी सांगणाऱ्या या साक्षीदाराची साक्ष अजिबात विश्वासार्ह मानली जाऊ शकत नाही.
गुन्ह्यात वापरलेली गाडी जळून खाक झाली होती. तरीही जप्ती पंचनाम्यात तिचा रंग ‘हिरवा’ कसा लिहिला? कागदपत्रे पाहून रंग लिहिल्याचे अधिकारी सांगतात, मात्र मूळ पुरावा सिद्ध होत नाही. एका साक्षीदाराने गाडी छोट्या घराच्या बाजूला उभी असल्याचे सांगितले, दुसऱ्याने बंगल्याच्या बाजूला, तर पोलीस रेकॉर्डनुसार ती मोकळ्या जागेत सापडली. या सर्व लहान गोष्टींमधील तफावत सरकारी पक्षाचा हेतू संशयास्पद बनवते.
न्यायालयाने मान्य केले की, 2002 नंतर पवनराजे निंबाळकर आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यात तेरणा साखर कारखाना आणि निवडणुकीतील पराभवामुळे मोठी राजकीय दरी निर्माण झाली होती. पूर्ववैमनस्यातून हत्येचा कट रचल्याचा सीबीआयचा आरोप होता आणि पवनराजेंनी जीवाला धोका असल्याचे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, केवळ राजकीय वैमनस्य आहे म्हणून कोणाला फासावर लटकवता येत नाही, त्यासाठी कायद्याला ठोस पुराव्यांची गरज असते.
Pawanraje Nimbalkar murder case: All accused acquitted as approver’s testimony found unreliable and doubtful
महत्वाच्या बातम्या
- Shinde Sena : मुंबई महापालिकेत ‘ऑपरेशन टायगर’? ठाकरे गटातील 25 नगरसेवक संपर्कात असल्याचा शिंदे सेनेचा दावा
- Deepak Sawant : मुंबई महापालिकेत ठाकरे गटाला झटका, दीपक सावंत यांचे जात प्रमाणपत्र अवैध
- Sanjay Raut : मानहानीच्या खटल्यात संजय राऊत यांच्या निर्दोषमुक्तीला मेधा सोमैया यांचे हायकोर्टात आव्हान
- BEST Employees’ : न्यायालयाच्या आदेशानंतरही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप