Tukaram Mundhe : हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मोफत पिण्याचे पाणी बंधनकारक; नियम मोडल्यास कठोर कारवाईचा तुकाराम मुंढेंचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Tukaram Mundhe अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात ग्राहक सुरक्षेबाबत कठोर भूमिका घेत कारवाईचा धडाका सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर ग्राहकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेत हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांमध्ये पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे.Tukaram Mundhe

एफडीएच्या आदेशानुसार सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी ग्राहकांना मोफत सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याची सूचना ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.Tukaram Mundhe



मुंढे यांनी केवळ मोफत पाण्यापुरतेच नव्हे तर स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांबाबतही स्पष्ट निर्देश दिले आहेत. ग्राहकांसाठी सुरक्षित पिण्याचे पाणी, लिक्विड हँडवॉश, साबण आणि स्वच्छ टॉवेल उपलब्ध करून देणे हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी आवश्यक करण्यात आले आहे.

“सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे स्पष्ट करत मुंढे यांनी ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ या मोहिमेचा उद्देश नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हा असल्याचे सांगितले.

ग्राहकांना मोफत पाणी नाकारणाऱ्या, स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या किंवा एफडीएच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांवर दंडात्मक कारवाई, परवाना निलंबन किंवा परवाना रद्द करण्यासारखी पावले उचलली जाऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली ग्राहकांकडून आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क रोखण्यास मदत होणार असून राज्यातील लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी येत्या काही आठवड्यांत एफडीएकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Free Drinking Water Now Mandatory at Hotels, Restaurants; Tukaram Mundhe Warns of Strict Action

महत्वाच्या बातम्या